गाडी अडवली म्हणून पिंपरीत पोलिसांना मारहाण  - Youth attacked on Police in Pimpri | Politics Marathi News - Sarkarnama

गाडी अडवली म्हणून पिंपरीत पोलिसांना मारहाण 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 11 मे 2020

नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणीसाठी मोटार थांबविल्याच्या रागातून एकाने पोलिसांना मारहाण केली. तसेच, पोलिसांच्या वाहनातून नेत असताना डोके आपटून या वाहनाची काच फोडली.

पिंपरी : नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणीसाठी मोटार थांबविल्याच्या रागातून एकाने पोलिसांना मारहाण केली. तसेच, पोलिसांच्या वाहनातून नेत असताना डोके आपटून या वाहनाची काच फोडली. ही घटना बोपखेल येथे घडली. 

महेंद्र रवींद्र वाघमारे (वय 45, रा. रामनगर, बोपखेल) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार संजय कामठे यांनी फिर्याद दिली. रविवारी (ता.10) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी व इतर पोलिसांनी बोपखेल फाटा येथील नाकाबंदीच्या ठिकाणी आरोपीची मोटार तपासणीसाठी थांबविली होती. या रागातून वाघमारे याने फिर्यादीच्या गालावर थप्पड मारली, तर पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघमारे याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनातून नेत असताना त्याने वाहनाच्या काचेवर डोके आपटून काच फोडली. दिघी पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स