sambhajirao bhide guruji-nitin Chougule
sambhajirao bhide guruji-nitin Chougule

भिडे गुरूजींचा चेला कच्चा निघाला नाही... शिवप्रतिष्ठानला पर्याय देण्याची तयारी

श्री. चौगुले यांनी शिवप्रतिष्ठानला धक्का न देता वाटचाल राहील असे स्पष्ट केले. परंतू या फुटीमुळे अनेकांना धक्का मात्र बसला.

सांगली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळी प्रचारक राहिलेल्या संभाजीराव भिडे गुरूजी यांनी जवळपास 30 वर्षापूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना केली. गडकोट मोहिम आणि छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्या विचारांचे धारकरी महाराष्ट्रात व राज्याबाहेर निर्माण केले. गेले 20 वर्षे श्री. भिडे यांच्याबरोबर सावलीसारखे वावरणारे
कार्यवाह नितीन चौगुले यांना निलंबित करण्यात आले. त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या नव्या संघटनेची घोषणा केली. त्यामुळे शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडल्याचे मानले जाते.

श्री. चौगुले यांनी शिवप्रतिष्ठानला धक्का न देता वाटचाल राहील असे स्पष्ट केले. परंतू या फुटीमुळे अनेकांना धक्का मात्र बसला. कच्च्या गुरूचा चेला नसल्याचे सांगणारे श्री. चौगुले हे गुरूजींप्रमाणेच वाटचाल करणार काय? हे येणारा काळ आणि त्यांचे समर्थकच ठरवतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून परिचित असलेल्या श्री. भिडे यांनी संघातून बाहेर पडल्यानंतर जवळपास 30 वर्षापूर्वी शिवप्रतिष्ठानची घोषणा केली. त्यानंतर ध्येयाने झपाटल्यामुळे राज्यभर दौरे करून आणि हिंदुत्ववादी विचारांचे स्फुल्लिंग सर्वत्र पेटवले. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज हे दोन जगण्या-मरण्याचे मंत्र असल्याचे हजारो-लाखो
कार्यकर्त्यांच्या मनात बिंबवले. गडकोट मोहिमातून कार्यकर्त्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण केली. त्यांच्यासमोर इतिहासातील महापुरूषांचा आदर्श निर्माण केला. दुर्गामाता दौड, बलिदान मास, शिवराज्याभिषेक आदी कार्यक्रमातून महाराष्ट्र व राज्याबाहेर हजारो नव्हे लाखो कार्यकर्त्यांचे नेटवर्क निर्माण केले.
गेली 20 वर्षे श्री. भिडे यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असलेले श्री. चौगुले

त्यांचे अत्यंत विश्‍वासू समर्थक मानले जातात. गेल्या काही वर्षात श्री. भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्यातून अनेक विरोधकांना अंगावर घेतले. तसेच आंदोलनातून कठीण प्रसंग निर्माण केले. राजकारण विरहीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठानवर राजकीय पक्षाच्या वळचणीला गेल्याचा आरोप होऊ लागला. सोशल मिडियातून त्यांच्यावर टिकेचा भडीमार झाला. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आंदोलनेही झाली. काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासमोरील ढाल म्हणून श्री. चौगुले राज्यभर परिचित झाले. श्री. भिडे यांचा शब्द प्रमाण मानून ते कार्यरत राहिले. श्री. भिडे
यांच्यावर टिका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी मागे हटले नाहीत. त्यामुळे श्री. भिडे यांच्यानंतर शिवप्रतिष्ठानमधील आश्‍वासक चेहरा म्हणून श्री. चौगुले यांची ओळख निर्माण झाली.

गेल्या वर्षभरापासून मात्र शिवप्रतिष्ठानमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू होत्या. श्री. चौगुले यांचे स्थान न बघवलेल्या काहींनी तक्रारी करण्यास सुरवात केली. तक्रारींवरून श्री. चौगुले यांना म्हणणे मांडण्याची संधी न देता निलंबित केले. त्यामुळे मनातील खदखद कार्यकर्त्यांपुढे मांडून श्री. चौगुले यांनी मते आजमावली. अखेर नव्या संघटनेची घोषणा केली. राजकारण
विरहीत संघटना असल्याचे जाहीर करत श्री. भिडेंना आदर्श मानून वाटचाल राहिल असे जाहीर केले. परंतु शिवप्रतिष्ठानमधील ही फूट अनेकांना रूचलेली नाही. श्री. चौगुले यांच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. तर त्यांच्या विरोधकांना हे अपेक्षितच होते. परंतू ही फूट म्हणजे शिवप्रतिष्ठानला मोठा धक्का मानला जातोय. भविष्यात दोन्ही संघटनांची वाटचाल कशी राहणार? हे येणारा काळच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com