हार्दिक पटेल पवारांच्या भेटीला.... गुजरात काॅंग्रेसमध्ये खळबळ - hardik patel meets Sharad Pawar in New Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

हार्दिक पटेल पवारांच्या भेटीला.... गुजरात काॅंग्रेसमध्ये खळबळ

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

पटेल यांच्यासाठी नवा मार्ग?

मुंबई: गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी गुरूवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईस्थित सिल्व्हर ओक या निवासस्थानी पटेल यांनी पवारांशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसवर मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर पटेल यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. 

दरम्यान, या भेटीची गुजरातपासून मुंबईपर्यंत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून चर्चेचा अधिकृत तपशील अजूनही मिळालेला नाही. परंतु, पुढील वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका, आरक्षण हे मुद्दे चर्चेत होते, अशी सूत्रांची माहिती आहे. गुजरातमधील प्रमुख महापालिकांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात भाजपचा मोठा विजय झाला तर काँग्रेसला पराभवाची धूळ चाखावी लागली. 

पवारांबरोबरच्या भेटीमुळे पटेल काँग्रेसची साथ सोडून गुजरातेत राष्ट्रवादीचे घड्याळ तर हाती बांधणार नाहीत ना, असा प्रश्नही या निमित्ताने चर्चिला जाऊ लागला आहे. पवार यांच्या भेटीपूर्वी पटेल आमदार रोहित पवार यांनाही भेटल्याचे सांगण्यात आले. हार्दिक पटेल यांना अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाकडून गुजरातच्या बाहेर जाण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली. दिल्लीतील यूथ काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना देखील पटेल भेटल्याची माहिती मिळाली आहे. हार्दिक हे 2017 मध्ये काॅंग्रेसमध्ये दाखल झाले. 2020 मध्ये त्यांना कार्याध्यक्ष बनविण्यात आले. पटेल समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी रान पेटवले होते. गुजरातमध्ये त्यांचा मोठा दबदबा तयार झाला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग काॅंग्रेसला झाला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख