चहाची टपरी बंद झाल्याने मांजरेकरांकडून मागितली 35 कोटींची खंडणी  - 35 crore ransom demanded from Manjrekar due to closure of tea shop | Politics Marathi News - Sarkarnama

चहाची टपरी बंद झाल्याने मांजरेकरांकडून मागितली 35 कोटींची खंडणी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

लॉकडाउनमध्ये चहाची टपरी बंद झाल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे.

मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने मांजरेकर यांच्याकडे तब्बल 35 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी आरोपीला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

लॉकडाउनमध्ये चहाची टपरी बंद झाल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या टोळीतील एक व्यक्ती असल्याचे सांगत खंडणीसाठी संदेश पाठवला होता. त्याने 35 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपीची मागणी केली होती. याप्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी समांतर तपास करून तात्काळ त्याला गुरूवारी सकाळी अटक केली.

मिलींद बाळकृष्ण तुळसणकर असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याची धारावी येथे चहाची टपरी होती. लॉकडाउनमध्ये त्याचा चहाचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे कमाईचे कोणतेही साधन त्याच्याकडे नव्हते. लॉकडाउनमध्ये धारावीमध्ये मोठ्याप्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे अखेर तुळसणकरने कोकणातील खेड हे गाव गाठले. पण तेथेही त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. तुळसणकरला अंडरवर्ल्डबाबत माहिती घेणे आवडायचे. त्यामुळे तो गॅंगस्टर अबु सालेमचे व्हिडीओ पहायचा. त्यातून त्याने पैसे कमवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला.

मांजरेकर यांना सर्वप्रथम 23 ऑगस्टला त्याने दूरध्वनी केला होता. पण त्यांनी तो न उचलल्यामुळे 23 ऑगस्टला त्यांने धमकीचे दोन संदेश महेश मांजरेकर यांना पाठवले. त्यांनी ते वाचल्यांतर तात्काळ याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. पण घडनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय सावंत, पोलिस निरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात केली.

त्यावेळी संदेश पाठवणारा व्यक्ती खेड येथून संदेश पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तुळसणकरपर्यंत पोलिस पोहोचली. त्याला चौकशीसाठी गुरूवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले. खंडणी विरोधीत पथकाच्या कक्षात करण्यात आलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला गुरूवारी सकाळी अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सध्यातरी आरोपीचा अबु सालेम अथवा अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध असल्याचे निष्पन्न झालेले नाही. तरी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

त्या व्यक्तीचा मला संदेश आला आणि त्याने पैशाची मागणी केली. त्यामुळे मी त्या व्यक्तीविरुद्ध रीतसर पोलिसांत तक्रार नोंदविली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक देखील केली आहे. मुंबई पोलिसांनी आपली कामगिरी चोख केली आहे. मी सध्या पोलिस संरक्षण वगैरे घेतलेले नाही
महेश मांजरेकर, अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक   
Edited  by : Mangesh Mahale      
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख