नागपूर जिल्ह्यात जागावाटपात शिवसेनेच्या हाती येणार भोपळा ?

 नागपूर जिल्ह्यात जागावाटपात शिवसेनेच्या हाती येणार भोपळा ?

नागपूर : युतीचा जागा वाटपाचा फॉम्युला ठरला आहे. त्यानुसार आधी मित्रपक्षांना जागा वाटप केल्या जाईल. उर्वरित जागा भाजप-सेना आपसात वाटून घेणार आहे. मात्र भाजप जिंकलेल्या जागा सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

महाजनादेश यात्रेदरम्यान नागपूरमध्ये आले असताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीच्या फॉर्म्युला सांगितला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यापूर्वी युतीत असलेल्या सर्वच मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. त्यात जिल्ह्यातील रामटेक व काटोल तर शहरातील दक्षिण नागपूरचा समावेश आहे. शिवसेनेकडून या जागा परत मागितल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री म्हणाले, खूपच गरज असेल तर त्या जागांवर आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करू. त्या बदल्यात दुसऱ्या जागा घेऊ. 

युती असतानाही शिवसेनेला रामटेकचा अपवाद वगळता जिल्ह्यातून आजवर एकही जागा जिंकता आलेली नाही. रामटेकमधून आशिष जयस्वाल दोनवेळा जिंकून आले आहे. मात्र युती तुटल्यानंतर मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. येथे भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले. जयस्वाल सध्या खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. काटोल शिवसेनेच्या कोट्यात होते. मात्र अनिल देशमुख यांना हरवणे शिवसेनेच्या उमेदवाराला कधीच जमले नाही. मागील निवडणुकीत मात्र भाजपच्या आशिष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. दक्षिण नागपूरमधून किशोर कुमेरिया दोनदा लढले. मागील निवडणुकीत किरण पांडव उमेदवार होते. त्यानंतरही सेनेला ही जागा जिंकता आली नाही. येथे भाजपचे सुधाकर कोहळे आमदार आहेत. काटोल आणि मध्य नागपूरच्या जागेवरचा हक्क शिवसेनेने आधीच सोडला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com