`माळेगाव`साठी तरुण नेत्यांची अजितदादांकडे आणि सिनिअर तावरेंकडे फिल्डिंग! - youth leaders try to get ticket for malegaon election | Politics Marathi News - Sarkarnama

`माळेगाव`साठी तरुण नेत्यांची अजितदादांकडे आणि सिनिअर तावरेंकडे फिल्डिंग!

कल्याण पाचंगणे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

...

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कारभार मोजक्या अनुभवी नेत्यांबरोबर अधिकाधिक युवकांच्या हातात देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तरच साखर धंद्यात दुसरी पिढी तयार होईल, अशी अपेक्षा अनेक इच्छुक उमेदवार युवामंडळींनी केली आहे.

विशेषतः उमेदवारांच्या यादीत सिव्हिल इंजिनिअरपासून बदलत्या बाजारपेठेतील खरेदी-विक्रीचे तंत्रशुद्ध ज्ञान असलेले युवक कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅगेस पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनेल, सत्ताधारी सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख श्रेष्टी अनुभवी व नव्या युवा चेहऱ्यांचा कसा मेळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नीलकंठेश्वर पॅनेल विरुद्ध सत्ताधारी शेतकरी पॅनेलमध्ये मुख्य लढत होणार आहे. नीलकंठेश्वर पॅनेलचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे आपल्या पॅनेलचे अधिकृत उमेदवार उद्या मंगळवार (ता.४) रोजी जाहिर करणार आहेत, तर सत्ताधारी शेतकरी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे यांनी पुढील दोन दिवंसात आम्हीही उमेदवारांची नावे जाहिर करणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांकडे युवकांनी चांगलीच फिल्डींग लावल्याचे दिसते. खासगीच्या स्पर्धेत सहकारी साखर उद्योग टिकण्याचे मोठे आव्हान आहे. या प्रतिकूल स्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही अनुभवी नेत्यांबरोबर उच्चशिक्षित तरूणांना या साखर धंद्यात उतरविणे खूप महत्वाचे आहे, असे मत इच्छुक उमेदवार व उद्योजक नितीन जगताप यांनी व्यक्त केले.

जगताप म्हणाले,`` शुगर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर पदाधिकाऱ्यांनाही तांत्रिक बाबींची माहिती असणे काळाची गरज बनली आहे. कामी कालावधीत व कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी यापुढील काळात व्यवस्थापनाबरोबर यांत्रिकी विभागात तंत्रशुद्धपणा आणण्यास अलिकडच्या काळातील युवामंडळी उत्सुक असतात.  त्यासाठी माळेगावच्या यंदाच्या निवडणूकीत उच्चशिक्षित युवकांना अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे, त्यात कारखान्याबरोबर सभासदांचा फायदा आहे.``

दरम्यान, माळेगावच्या कारभारात आपल्या उच्चशिक्षित ज्ञानाचा फायदा व्हावा, या उद्देशाने अनेक युवकांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. उद्योजक नितीन सातव, स्वप्निल जगताप योगेश जगताप, नितीन जगताप, रणजित धुमाळ, संदीप तावरे, अशोक सस्ते, सतिश तावरे, दिपक तावरे, कुलभूषण कोकरे, विनायक गावडे, दादा थोरात, शिवराज जाधवराव, नेताजी गवारे, जवाहर इंगुले, संग्राम तावरे, राजेंद्र देवकाते, सौ. संगिता कोकरे, अनिल राऊत, विकास जगताप, संग्राम काटे, स्वरूप वाघमोडे आदींचा समावेश आहे.  

हे अनुभवी चेहरे...! 
माळेगाव कारखान्यामध्ये अध्यक्ष व संचालक म्हणून सर्वाधिक काळ काम केलेले चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, रंजन तावरे,  अॅड. केशवराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे माजी संचालक संपतराव देवकाते, अॅड. जी.बी.गावडे, अनिल तावरे आदी अनुभवी नेत्यांनी आपली उमेदवारी जाहिर केली आहे. या नेत्यांपैकी कोणाचा अनुभव माळेगावच्या चालू निवडणूकीत कामी येतो, याची उत्सुकता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख