'कोरोना' साठी अंबडला पोलिसांच्या मदतीला युवकांचे विशेष पथक - Youth Helping Nashik Police to Curb Corona | Politics Marathi News - Sarkarnama

'कोरोना' साठी अंबडला पोलिसांच्या मदतीला युवकांचे विशेष पथक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोनाजन्य परिस्थितीत स्वतःहून पोलिसांना मदत करावी अशी इच्छा असणाऱ्या युवकांची निवड करण्यात आली असून यामध्ये सध्याचे प्रमाण 50 जणांचा आहे

नाशिक : कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने त्यांना मदतनिस म्हणून 50 तरुणांची निवड करून त्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने 'विशेष पोलीस अधिकारी" पदाचा दर्जा देत टी-शर्ट, शिटी व मास्क वाटप करण्यात आले असून हे सर्वजण खाकी वर्दीतील पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी मदत करणार आहेत.

सध्या संपूर्ण राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील नागरिक या कायद्याचा भंग करत घराबाहेर पडताना दिसत आहेत. रस्त्यावर तसेच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस फौजफाटा काही प्रमाणात कमी पडत असल्याचे वातावरण दिसत आहे. तसेच पोलिसांवर मोठ्याप्रमाणात कामाचा ताण जाणवत आहे. अशातच पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणेही दुरापास्त झाले आहे. 

यावर उपाय म्हणून अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोनाजन्य परिस्थितीत स्वतःहून पोलिसांना मदत करावी अशी इच्छा असणाऱ्या युवकांची निवड करण्यात आली असून यामध्ये सध्याचे प्रमाण 50 जणांचा आहे. यांना 'विशेष पोलीस अधिकारी' पदाचा दर्जा देण्यात आला असून त्यांना टी-शर्ट, शिट्टी व मास्क वाटप करण्यात आले आहे. दररोज आठ तास कामाची वेळ ठरविण्यात आली आहे.

गुरुवारी अंबड पोलीस ठाणे परिसरात या 'विशेष पोलीस अधिकारी' वर्गाला प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गर्दीवर नियंत्रण कसे आणायचे, नागरिकांशी बोलण्याची पद्धत, संशयितांवर कशाप्रकारे लक्ष ठेवायचं आदी बाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सदर उपक्रम हा संपूर्ण पोलिस ठाण्यांमध्ये राबविला जावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

राज्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. यावेळी पोलीस प्रशासनाला मदत व्हावी या उद्देशाने बहुतांश तरुणवर्ग इच्छुक आहे. या अनुषंगाने सद्यस्थितीत अंबड पोलिस ठाणे हद्दीत एकूण 50 युवकांना संधी देण्यात आली असून त्यांची मदत होणार आहे. वर्तणूक बघूनच त्यांची निवड करण्यात आली आहे -  कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख