Youth Congress President Satyajeet Tambe Advice to Shivsena Aditya Thakray | Sarkarnama

संधी सोडणं महागात पडेल..सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

जे मिळवायचे आहे ते आताच मिळवा, कुणावर विसंबून राहू नका संधी पुन्हा येईलच असे नाही, असे सांगत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख व शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्याचा सल्ला दिला आहे. 

मुंबई : जे मिळवायचे आहे ते आताच मिळवा, कुणावर विसंबून राहू नका संधी पुन्हा येईलच असे नाही, असे सांगत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख व शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्याचा सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कळीच्या भूमिकेत नेऊन ठेवले आहे. जागावाटपावेळी नमती भूमिका घ्यावी लागलेल्या शिवसेनेच्या वाघाने आता सत्तेतल्या निम्या वाट्यासाठी डरकाळी फोडली आहे. यात अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी पहिल्या क्रमांकावर असू शकते.

त्यातच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाबाबत ज्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली ते ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आदित्य यांना अनुभव नाही , त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत, अशी एक चर्चा आहे. पण, याच चर्चेवर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एक फेसबुक पोस्ट करुन आदित्य ठाकरे यांना विनंती केली आहे की आलेली संधी सोडू नका. 

तांबे यांनी आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्यावेळी काय झाले होते याचे उदाहरणच दिले आहे. आदित्य यांना उद्देशून लिहिलेल्या  आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ते म्हणतात...
2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या. पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही...

राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा.........

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख