युवक कॉंग्रेसचा "नवा चेहरा युवा जोश!` : घराणेशाहीला फाटा देत नव्या नियुक्त्या

युवक कॉंग्रेसचा "नवा चेहरा युवा जोश!` : घराणेशाहीला फाटा देत नव्या नियुक्त्या

मुंबई : देश आणि राज्याच्या पातळीवर कॉंग्रेसमध्ये पराभूत मानसिकतेचे सावट कायम असताना, युवक कॉंग्रेसने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या आणि पदोन्नतीद्वारे निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे. या नव्या नियुक्‍त्या किंवा पदोन्नत्या करताना युवक कॉंग्रेस सर्वसामान्य कुटुंबातील युवक-युवतींना संधी देऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे बदलवू पहात आहे.


महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रदेश कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी आणि विधानसभा कार्यकारिणीवर नुकत्याच नवीन नियुक्‍त्या जाहीर केल्या. तसेच काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नवीन जबाबदारी देऊ केली.

हे करताना तांबे यांनी जाणीवपूर्वक सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी देऊन घराणेशाहीला फाटा देण्याचा प्रयत्न केला. शिवाय विधानसभेच्या तोंडावरच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्याचे धाडसही त्यांनी दाखविले. सत्यजीत तांबे हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या परिवारातून येत असले तरी गेल्या 17 वर्षांतील त्यांच्या कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष या प्रवासात त्यांना संघटनेतील सामान्य कार्यकर्त्याची नाळ जोडून आहेत.

युवक कॉंग्रेसला आक्रमक स्वरूप देण्यात आणि तिचा विस्तार करण्यास तांबे यांनी प्राधान्य दिले आहे. मागील आठ महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा कार्यकारिणीचा विस्तार केला. या माध्यमातून सातत्याने नवीन युवकांना राजकीय प्रवाहात जबाबदारीच्या पदांवर कार्यरत ठेवले आहे.

राज्यात प्रथमच युवकांचा जाहीरनामा 
पन्नास टक्के युवक मतदार असूनही युवकांच्या भूमिकांचा विचार प्रत्यक्षात प्रचारामध्ये होत नाही, हे मागील काही निवडणुकांवरून दिसून आले आहे. यात युवक कॉंग्रेसने पुढाकार घेत महाराष्ट्रात प्रथमच युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेस सर्वसामान्य युवकांची मते जाणून घेण्याचा कार्यक्रम राबवणार आहे.

सुपर 60 : महत्वाकांक्षी उपक्रम
2009 च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने 165 जागा लढविल्या होत्या. त्यातील साठ जागांवर युवक कॉंग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, मागील विधानसभा निवडणुका, लोकसभा आदींच्या मतदानाचा विश्‍लेषणात्मक अभ्यास करून युवक कॉंग्रेसची यंत्रणा या मतदारसंघांमध्ये कार्यरत झाली आहे. थेट संपर्क ते सोशल मीडिया अशा सर्व आघाड्यांवर युवक कॉंग्रेस कडून काम केले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या साठ जागा प्रचंड ताकदीने लढवण्याचा कॉंग्रेसने निर्धार केला आहे.

घराणेशाहीला फाटा

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने कार्यकारिणीचा विस्तार करताना आणि पदोन्नती देताना सर्वसामान्य घरातील युवक पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. युवक कॉंग्रेसच्या विद्यमान सरचिटणीस कल्याणी माणगावे, मानस पगार ही त्यातील काही उदाहरणे. कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी शिवाय युवक कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवर त्यांना काम करण्याची मिळालेली संधी हे युवक कॉंग्रेसच्या बदलत्या धोरणाचाच भाग आहे. याशिवाय एनएसयूआयच्या माध्यमातून राज्यपातळीवर नेतृत्व करणाऱ्या शिवराज मोरे यांना युवक कॉंग्रेसने प्रदेश सरचिटणीस म्हणून सामावून घेतले आहे. प्रदेश उपाध्यक्ष नागसेन भेरजे, सरचिटणीस आदित्य सावळेकर, सरचिटणीस श्रीनिवास नंल्लमवार, सरचिटणीस मूक्तदिर देशमुख यांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीने सामान्य युवकांना संधी मिळाली आहे. युवक कॉंग्रेसचा घराणेशाहीला फाटा देण्याचा हा धाडसी प्रयत्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.

आंदोलनाचा चेहरा कायम
युवक कॉंग्रेसचा गेल्या आठ महिन्यांचा प्रवास हा आक्रमक आणि आंदोलकाच्या भूमिकेत राहिला आहे. युवक कॉंग्रेसनेही आपली ही भूमिका लोकसभेतील मोठया पराभवानंतरही कायम ठेवली आहे. एकीकडे कॉंग्रेसमध्ये सुस्ती आलेली असतानाही कर्नाटकाचे बंडखोर कॉंग्रेस आमदार मुंबईतील ज्या सोफिटेल हॉटेलमध्ये थांबले होते तिथे युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सलग दोन दिवस आंदोलन केले. त्यानंतर त्या आमदारांना गोवा आणि महाराष्ट्रात इतरत्र स्थलांतरित करावे लागले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com