पुणे : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास 'सीबीआय' कडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि काही वेळातच पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला साठ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
पार्थ यांनी या आधी जी ट्विट केली आहेत, त्याला सरासरी तीन हजार लाईक्स मिळाल्या आहेत. मात्र, कालच्या ट्विटने उच्चांक गाठला आहे. त्यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही टिका करणाऱ्या आहेत तर काही पार्थ यांची प्रशंसा करणाऱ्या. हे ट्विट दहा हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. तर जवळपास चार हजार कमेंट्स या ट्विटवर आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी राममंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. या दोन्ही भूमीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमीकेशी विसंगत होत्या. त्यानंतर आपण पार्थच्या म्हणण्याला कवडीचीही किंमत देत नाही, पार्थ अपरिपक्व आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.
या ट्विटनंतर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 'पार्थ यांच्या ट्विट बाबत मला काही बोलायचं नाही, त्यांचे ट्विट तुम्ही कश्या पद्धतीने घ्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे आणि सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ही माझं मत आहे,'' असे पार्थ पवार म्हणाले होते.
Edited By - Amit Golwalkar

