No medical Facilities in Jumbo Covid Centre in Pune Say MLA Siddharth Shirole | Sarkarnama

जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय सुविधांची वानवाच : आमदार सिद्धार्थ शिरोळे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी पुण्यात जम्बो केअर सेंटर उभे केले पण तिथेही सुविधांचा अभाव आहे, एकीकडे कोरोना साथीचा प्रकोप आहे आणि दुसरीकडे रूग्णांची हेळसांड होते आहे. आता तरी मुख्य मंत्र्यांनी पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे

पुणे  : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी पुण्यात जम्बो केअर सेंटर उभे केले पण तिथेही सुविधांचा अभाव आहे, एकीकडे कोरोना साथीचा प्रकोप आहे आणि दुसरीकडे रूग्णांची हेळसांड होते आहे. आता तरी मुख्य मंत्र्यांनी पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

"पुण्यामध्ये आज पहाटे टीव्ही ९ वाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना उपचार मिळण्यात अनेक अडचणी आल्या. उपचारास विलंब होणे, उपचार न मिळणे अशा कारणाने पुण्यात अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या पाच महिन्यात वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. मुख्य मंत्री, पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे पुणेकरांची कैफियत मी मांडली, चिवटपणे पाठपुरावा केला. त्यानंतर जम्बो केअर सेंटर उभे राहिले. उदघाटन झाले पण नंतर शासनाचे दुर्लक्षच झाले. या आठशे खाटांच्या सेंटरमध्ये पुरेसा वैद्यकीय स्टाफ नाही, तिथे रुग्णांशी आपुलकीने वागले जात नाही, अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत," असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

"पुण्यात साथीचा प्रकोप होईल असे वैद्यकीय तज्ञांनी वारंवार सांगितले, त्या आधारे मी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रे पाठवली, ईमेल केले, त्याला प्रतिसाद नाही. सध्या तर साथीत मृत्यू दर वाढू लागल्याने पुणेकर काळजीत पडले आहेत.मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मुक्काम ठोकून दैनंदिन आढावा घेऊन वैद्यकीय यंत्रणा मार्गी लावण्याची गरज आहे,'' असे आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आज चर्चा केली , त्यांनीही माझ्या मागणीला दुजोरा दिला, असे शिरोळे यांनी सांगितले
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख