MLA Rohit Pawar Wants Temples to Reopen | Sarkarnama

रोहित पवारांनी मंदिरांबाबत केली 'ही'मागणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 ऑगस्ट 2020

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराबाबत एका कार्यकर्त्याने ट्विटरवरुन केलेल्या विनंतीला आमदार रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंदिरे सुरु करण्याबाबत आपण पाठपुरावा करुन असे उत्तर रोहित पवार यांनी या कार्यकर्त्याला दिले आहे

पुणे : देशभरात कोरोनाच्या साथीमुळे लावाव्या लागलेल्या लाॅकडाऊनमुळे १८ मार्चपासून धार्मिक स्थळे बंद आहेत. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराबाबत एका कार्यकर्त्याने ट्विटरवरुन केलेल्या विनंतीला आमदार रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंदिरे सुरु करण्याबाबत आपण पाठपुरावा करुन असे उत्तर रोहित पवार यांनी या कार्यकर्त्याला दिले आहे. 

'मंदिर चालू करा दादा , तुळजाभवानी मंदिर ५ महीने झाले बंद आहे. इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे, बैंक ईएमआय वाढत चाललेत,' असे ट्विट एका कार्यकर्त्याने रोहित पवार यांना टॅग करत केले. त्यावर 'मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील,' असे उत्तर रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे दिले. 

दरम्यान, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जम्मू-काश्‍मिरातील वैष्णोदेवी मंदिर आज (रविवार ता. १६) भाविकांसाठी खुले होत आहे. कोरोना संकटामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेले मंदिर खुले होत असून दररोज दोन हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  १८ मार्च रोजी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आता देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने मंदिरही सुरू होत आहे. त्याचाच भाग म्हणून पहिल्या आठवड्यात दररोज दोन हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतरही परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे श्री वैष्णोदेवी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना नियमांचे पालन करणे गरजेचे असून प्रत्येकाने मास्क परिधान करणे आणि मोबाईलमध्ये आरोग्यसेतू ऍप असणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय १० वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख