'I want to be a driver,' said RR Abba's son. | Sarkarnama

आर. आर. आबांचा मुलगा म्हणाला, 'मला ड्रायव्हर व्हायचं आहे.'

संपत मोरे
रविवार, 16 ऑगस्ट 2020

"हो मला आबांनी तसं विचारलं होत तेव्हा मला गाडी चालवायला आवडायची मग मी त्यांना मला ड्रायव्हर व्हायचं आहे असं सांगितलं.

पुणे : "आबांनी मला विचारलं तू कोण होणार तेव्हा मला गाडी चालवायला आवडायची मग मी म्हणालो, 'मला ड्रायव्हर व्हायचं आहे.' आबा म्हणाले. 'ठीक आहे तुला ड्रायव्हर करू," अशी एक आठवण आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी सांगितली.

माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी आर. आर. आबांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील आणि सुपुत्र रोहित यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला.

"आर. आर. आबा आज आपल्यात नाहीत. आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोनाच्या काळात सक्षमपणे काम करत आहेत. त्यामुळे लोक आता त्यांचे काम पाहून आबांची आठवण येत आहे, असे सांगत आहेत. आजही आबांची आठवण झाली तरी अंगावर काटे येतात," असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

सुप्रियाताई यांनी सुमनताई आणि रोहित यांना प्रश्न विचारले..
सुप्रिया सुळे, "तूला काय व्हायचं आहे असं आबांनी कधी विचारलं होत का?"
रोहित पाटील, "हो मला आबांनी तसं विचारलं होत तेव्हा मला गाडी चालवायला आवडायची मग मी त्यांना मला ड्रायव्हर व्हायचं आहे असं सांगितलं. नंतर काही काळाने आबांच्या जवळचे पोलिस पाहून मी त्यांना पोलीस कमिशनर व्हायचं आहे, असं म्हणालो तेव्हा ते मला म्हणाले, "तुला पोलीस कमिशनर व्हायचं असेल तर उंची वाढवावी लागेल. माझ्याएवढी उंची असेल तर तुला कमिशनर होता येणार नाही."

यावेळी रोहित पाटील यांनी आबांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, "आबांचा महिन्यातून एकदा फोन यायचा.ते मला कसा आहेस अस विचारायचे आणि पुन्हा मार्कांची चौकशी करायचे. सुट्टीच्या दिवशी ते आम्हाला घेऊन रानात जायचे.आम्ही हुरडा खायचो. त्यावेळेस ते फक्त आम्हाला वेळ द्यायचे."

"आबांनी मुलांना कधीही शिक्षा केली नाही, त्यांच्यावर कधी रागावले नाहीत. रोहित  लहान असताना त्यांच्यापुढे जात नव्हता. आबा जसे रागीट नव्हते. तसाच रोहित आहे," असे आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या.

"माझ्या बहिणीनी जेव्हा आबांना तुम्ही आम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का घातले नाही असे विचारले तेव्हा आबा म्हणाले, "तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला नाहीत म्हणून तुमचे काय नुकसान झाले? जिल्हा परिषदेच्या शाळांच्यावर आबांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले," असे रोहीत पाटील म्हणाले.
 Edited  by : Mangesh Mahale    

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख