Can CET be taken at taluka level ..? | Sarkarnama

सीईटी तालुका स्तरावर घेता येईल का..? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सीईटी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक अधिकार आहेत. सद्याची स्थिती पाहून सीईटी रद्द करण्याचा विचार करत आहोत. मात्र याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

पुणे : तालुका स्तरावर सीईटी घेता येईल का, याचा विचारही होत आहे. सीईटीबाबत अभियान सुरू असून येत्या सात ते आठ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

शिक्षक/ प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीस  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उदय सामंत म्हणाले की सीईटी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक अधिकार आहेत. सद्याची स्थिती पाहून सीईटी रद्द करण्याचा विचार करत आहोत. मात्र याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. याबाबत उद्या न्यायालयात तारीख आहे. या पार्श्वभूमीवर सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, "याबाबत उद्या न्यायालयात तारीख आहे. त्यामुळे त्या विभागाचा प्रमुख म्हणून आज मी त्यावर बोलणं उचित नाही. जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आता करत आहोत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परीक्षा घेता येणार नाहीत, आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही न्यायालयासमोर सादर केले आहे."

सामंत म्हणाले, "प्राध्यापक आणि शिक्षक यांनी आधुनिक ज्ञान घ्यावे, या उद्देशाने टीचर ट्रेनिंग अकॅडमीची स्थापना झाली आहे. अॅकॅडमी एक डिसेंबरला सुरू करण्याचे ठरविण्यात आले असं आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना पुण्यात विद्या दान मिळणार आहे."

संबंधित लेख