तिच्या जिद्दीला 'आधार'ची मदत.. झाली कोविड योद्धा  

अनुजा नावंदे हिची कंधार, जि. नांदेड येथील कोवीड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.
anuja.jpeg
anuja.jpeg

संगमनेर : ती बारावीला असताना तिच्या वडिलाचं निधन झालं. आधार फाऊंडेशनने तिला दत्तक घेतलं. ती जिद्द आणि कष्टांच्या बळावर बीएएमएस झाली. आता ती कोवीड योद्धा म्हणून कार्यरत आहे. ही कहाणी आहे. संगमनेरच्या अनुजा नावंदे हिची. 

घरातल्या कर्त्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाल्याने तीच्यासह पाच भावंडे, आई हतबल झाले होते. शिक्षण हीच पुढील भविष्यातील एकमेव शिदोरी असल्याची जाणीव झाल्याने, तिने जिद्दीने शिक्षण घेण्याचे ठरवले. संगमनेरच्या सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालयातून नुकतीच बीएएमएस. पदवी घेवून बाहेर पडलेल्या डॉ. अनुजा नावंदे हिची कंधार, जि. नांदेड येथील कोवीड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.

संगमनेरच्या घासबाजारात खासगी खोलीत राहणाऱ्या अनुजाची ओळख समवयीन मैत्रिणीबरोबर झाली. तिळगुळासाठी तिच्या घरी गेल्यानंतर आधार फाऊंडेशनचे समन्वयक रामदास बालोडे यांना तिची शैक्षणिक पार्श्वभुमी समजली. ती बारावीला असताना तिच्या वडीलांचे 2014 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. घरातला कर्ता पुरुष अकस्मात गेल्याने कुटूंब हादरुन गेले.

या दरम्यान अनुजा हिला शासकिय कोट्य़ातून संगमनेरच्या सिध्दकला महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आधार फाऊंडेशनने तिला दत्तक घेत मदतीचा हात पुढे केला. तिची पदवी पूर्ण होईपर्यंत तिला लागणाऱ्या वह्या पुस्तकांपासून शैक्षणिक बाबतीत येणाऱ्या आर्थिक अडचणी आधारच्या मदतीने दूर झाल्या. 
    

नुकतीच बीएएमएसची पदवी हातात पडल्याबरोबर तिला नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारीपदी रुजू होण्याची संधी मिळाली. तिचा एक भाऊ पुण्यात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकतो आहे. त्याला आधारचे सदस्य गुप्तचर विभागातील अधिकारी मृणाल पवार यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. दुसऱी बहिण फार्मसी करते आहे, तिसरी वैद्यकिय प्रवेश परीक्षेची तयारी करते आहे, तर सर्वात लहान भाऊ सातवीत शिकतो आहे. बालोडे परिवाराने तिला संगमनेरात दिलेले मुलीसारखे प्रेम, लावलेला लळा ती विसरु शकत नाही. आधारचे आभार व्यक्त करतानाच थोडे आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यानंतर आधारचा वसा पुढे चालवण्याचा निर्धार अनुजाने केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com