पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पनवेलचे विक्रांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी भाजपचे अनेक तरुण आमदार इच्छुक असताना पाटील यांच्या गळ्यात माळ पडली आहे.
भाजपच्या तरुण नेत्यांमध्ये या पदाचे आकर्षण असते. भाजपच्या अनेक विद्यमान नेत्यांनी या पदावर काम करून पुढे राज्यात आपला ठसा उमटवला. योगेश टिळेकर यांच्याकडे गेली पाच वर्षे या पदाची जबाबदारी होती. त्यांच्यासोबत सरचिटणीस म्हणून काम पाहणाऱ्या पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी संधी मिळाली आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर अशा तरुण नेत्यांनी गेल्या दशकात या पदावर काम केले होते. त्या आधी गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे या नेत्यांनीही युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात आपला ठसा उमटविला होता.
त्यामुळेच राज्यातील काही तरुण आमदार या पदासाठी स्पर्धेत होते. इतर ज्येष्ठ नेत्यांनीही आपल्या समर्थकांना या पदावर बसविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात पाटील यांनी बाजी मारली.
विक्रांत यांचे वडील बाळासाहेब हे रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात भाजपला बस्तान बसविण्यात बराच संघर्ष करावा लागला. विक्रांत यांनी विद्य आघाडीपासून पक्षात काम केले. संभाजी पाटील निलंगेकर हे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असताना पाटील यांनी संघटनेत काम करायला लागले. त्यानंतर पंकजा मुंडे आणि योगेश टिळेकर यांच्यासोबत त्यांनी सरचिटणीस म्हणून काम पाहिले. पनवेल महापालिकेचे उपमहापौर म्हणूनही त्यांना एक वर्षासाठी संधी मिळाली होती. सध्या तेथे ते नगरसेवक आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करताना मी प्रयत्नांची पराकाष्टा करेन. अनेक मोठ्या नेत्यांनी या पदावर काम केल्याने त्याचे दडपण माझ्यावर आहे. पण दिलेली जबाबदारी पूर्ण करून तरुणांची राज्यातील प्रभावी संघटना म्हणून तिला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात पाटील यांच्यासह अनेक निवडी जाहीर करण्यात आल्या.

