MPSC आंदोलन : पुण्यात नक्की काय व कसे घडले आणि कोणी घडवले?

पुण्यातील एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा हा ॊआॅंखो देखा हाल...`
mpsc students
mpsc students

पुणे : गुरूवारी दुपारी दोनचा सुमार. टिळक स्मारकजवळच्या एका हॉटेलमध्ये कॉफी पिऊन बाहेर पडलो. तिथून पाच मिनिटात लाल बहाद्दुर शास्त्री रस्त्यावर आलो. बँक ऑफ महाराष्ट्र समोर रस्त्यावर गर्दी दिसली. जवळ जाऊन पाहिले तर मुले जोरजोरात घोषणा देऊ लागलेली. एका क्षणात ती रस्त्यावरच बसली. तोपर्यंत कोणताही चॅनेलचा कॅमेरामन वा दैनिकाचा फोटाग्राफर पोचला नव्हता. लोकसेवा आयोगाने परीक्षा रद्द केल्याने मुले आंदोलन करून लागल्याचे त्यांनी दिलेल्या घोषणांवरून लक्षात आले. सुमारे दोनशे विद्यार्थी असतील. शास्त्री रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर बसकन मारून बसलेले विद्यार्थी आणि राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. जसजसा वेळा जात होता तसतसा विद्यार्थ्यांचा लोंढा वाढत गेला.

आजूबाजूला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असलेल्याने काही वेळातच तिथे एक हजारहून अधिक विद्यार्थी जमले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नेटवर्क किती स्पीडचे आहे. याची जाणीव करून देणारा हा प्रसंग होता. गर्दी वाढतच होती. काही कळायच्या आत आमदार गोपीचंद पडळतर तिथे पोचले. तितक्यात पोलिसांची एक गाडी आली. त्यांनी विद्यार्थ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या एका बाजूच्या विद्यार्थ्यांन काठीने मारहाण करीत दोघांना गाडीत बसवले. परिणामी एक बाजू पूर्ण रिकामी झाली. दुसऱ्या बाजूच्या विद्यार्थ्यांमध्येदेखील चूळबूळ सुरू झाली. दुभाजकांवरून उडी मारून पोलीस तिकडेही गेले.

मात्र, गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना इशारा करीत स्वत: रस्त्यावर बसकन मारली. पोलीस या साऱ्यांना उठविण्याचा प्रयत्न करीत होते. या झटापटीत पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण केली. मात्र, विद्यार्थी बधले नाहीत. विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि तुलनेने फारच कमी पोलिस यामुळे शेवटी पोलिसांना काढता पाय घ्यावा लागला. पोलिसांची गाडी तिथून गेली खरी पण त्यांनी जदा कुमक मागविली. दरम्यान, विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत होती. चार वाजण्याच्या सुमारास ही संख्या सुमारे दोन हजारांच्यावर पोचली. याचवेळी भाजपाचे दुसरे युवा आमदार राम सातपुते या ठिकाणी पोचले. घोषणाबाजी आणि रस्त्यावरच्या आंदोलनात तरबेज असलेल्या आमदार सातपुते यांनी मुलांच्या मदतीने सारा परिसर घोषणांनी दणानून सोडला.

मधल्या काही वेळेत पोलिसांना सवड मिळाली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांशिवाय शहरातील जादा पोलीस कुमक मागविण्यात आली. दंगल नियंत्रणासाठी सज्ज असलेल्या जवानांसह त्यांची ‘वज्र’ची वाहने आंदोलनस्थळी आणण्यात आली. आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा परिसर चारी बाजूनी पोलिसांनी बंद करण्यात आला. चारही बाजूंनी पोलीस जवान तैनात करण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून आंदोलनात बेफामपणे घोषणाबजी करणारे विद्यार्थी मधूनच पाणी प्यायला बाहेर जात होते. मात्र, पाणी पिऊन पुन्हा नव्याने जोमाने घोषणाबाजीत सहभागी होत होते. या काळात अनेक वेळा पोलीस आधिकारी हे सर्व विद्यार्थी व पडळकर तसेच सातपुते यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.मात्र, परीक्षेच्या तारखेची घोषणा करा मगच जागेवरून उठतो, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.

आता साधारण पाच वाजले होते. यावेळी विद्याार्थ्यांची संख्या सुमारे तीन हजारांच्यावर पोचली असावी. कोरोनाची कसलीही भीती न बाळगता मोठ्या बेपर्वाईने ही मुले गर्दीत सहभागी होत होते. मधल्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुणीतरी हलगीवाले बोलावून आणले. हलगीच्या आवाजाने मुलं आणखी बेफाम झाली. यात भर पडली ती थाळ्यांची. जेवणासाठी असलेल्या स्टीलच्या थाळ्या मुलांनी आपल्या खोल्यांवरून आणल्या त्याच्या आवाजानेही परिसर दणानून गेला. या दरम्यान, घोषणा देणाऱ्या एकाला चक्कर आली. त्याला मुलांनीच उचलून रूग्णालयात नेले. त्याचे नेमके काय झाले आणि कोणत्या रूग्णालयात नेले हे गोंधळात समजले नाही. सात वाजले तरी आंदोलन सुरूच होते. आंदोलनात मुलींचे प्रमाणदेखील मोठे होते. राज्य सरकारने परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यापेक्षा १४ मार्चलाच व्हावी, अशी विद्यार्थ्यांची ठाम भूमिका होती.

दरम्यान साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार ही बातमी विद्यार्थ्यांमध्ये पसरली. आता साडेआठ वाजता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले. मधल्या काळात पुण्यातले भाजपचे अनेक नगरसेवक शहराध्यक्ष जगदीश मुळीत भेट देऊन गेले.दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी परीक्षा आठ दिवसात घेण्याची घोषणा केल्यानंतरही परीक्षा १४ मार्चलाच घेण्याच्या मुद्दयावर विद्यार्थी ठाम होते. रात्री आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. मात्र तोपर्यंत जोर ओसरलेला होता. बहुतांश एमपीएससी विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत उसनवारीवर जगत असतात. नोकरी नाही, घरून त्यासाठीचा तगादा, कौटुंबिक प्रश्न, पैशांची चणचण अशा अनेक समस्यांना या विद्यार्थ्यांना जावे लागते. या साऱ्यातून अभ्यास करावा तर त्यात परीक्षांचे वेळापत्रक बोंबललेले, निकालाची तारीख नेहमीच विलंबाने अशा त्यांच्या हातातील नसलेल्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. उत्तीर्ण होईपर्यंत नेहमीच इतरांच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी स्वबळावर आजचे आंदोलन करून परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सरकारने भाग पाडले. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन स्पर्धा परीक्षांची व्यवस्था सुधारण्यास यापुढे उपयोगात ठरेल, या आशेने तेथून बाहेर पडलो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com