अहमद पटेल यांच्यामुळे विलासरावांना मुख्यमंत्रिपद मिळाले... - Vilasrao got CM post due to Ahmed Patel says Dheeraj Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

अहमद पटेल यांच्यामुळे विलासरावांना मुख्यमंत्रिपद मिळाले...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

लातूरमध्ये अहमद पटेलांना वाहिली श्रद्धांजली...

लातूर : ज्येष्ठ नेते अहमद पटेल नसते तर महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती आपण साजरी करू शकलो नसतो. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यामागे अहमद  पटेल यांचा सिंहाचा वाटा होता, असे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी येथे सांगितले. अहमद जी पटेल यांच्या जीवनकार्यातून ऊर्जा घेऊन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्या, लोकहिताच्या आपल्या कामांना नवी धार आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

काँग्रेस भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे खजिनदार, ज्येष्ठ नेते अहमद जी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी शोकसभा आयोजिण्यात आली होती. यावेळी आमदार देशमुख बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड किरण जाधव, सर्जेराव मोरे, प्रताप पाटील, प्रवीण पाटील, दीपक सुळ, अभय साळुंखे, स्वयंप्रभा पाटील, हमिदपाशा बागवान, सय्यद रफिक, प्रवीण सूर्यवंशी, सुपर्ण जगताप, मोहन सुरवसे, सचिन दाताळ, प्रमोद जाधव, रमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि सक्रिय राजकारणात आल्यानंतर मला वेळोवेळी अहमद पटेल यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे सर्वसमावेशक विचार, त्यांची पक्षावर-नेतृत्वात असलेली निष्ठा हे सारे काही जवळून पाहता आले. अनुभवता आले. अडचणीच्या काळात खंबीर कसे राहायचे, हे त्यांनी निवडून आलेल्या आम्हा आमदारांना सांगितले होते. त्यांचा आशीर्वाद, पाठीवर थाप नेहमीच मिळायची. ती आता पुन्हा मिळणार नाही. याची मनात खंत आहे. त्यांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहेत, अशा भावना  देशमुख यांनी व्यक्त केल्या.

अहमद पटेल यांचा राजकीय जीवनपट अभ्यासण्यासारखा आहे. गुजरातच्या निवडणूकीत त्यांनी भाजपला हरवले. काँग्रेसचा एकटा नेता एका पक्षाला हरवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. या निवडणुकीनंतर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यात काँग्रेसने विजय मिळवला. पडता काळ असो की उभरता, 'पक्षनिष्ठा प्रथम' हा गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. कुठलेही संकट असो ते पक्षाचे कार्यकर्ते, नेते म्हणून धावून जात. पक्षाची बाजू ठामपणे मांडत, असे सांगून  देशमुख म्हणाले की स्वतःचा स्वार्थ, तात्पुरती कामगिरी, प्रलोभने याला बळी न पडता पक्षाशी, नेतृत्वाशी, देशाशी प्रामाणिक राहणे महत्वाचे असते, असे ते सांगायचे. राजकारणात येणारी नवी पिढी घडवण्यासाठी अशा नेत्यांची जास्त गरज आहे.

लातूरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले

विलासराव देशमुख साहेब आणि अहमद पटेल साहेब यांचे वेगळे नाते होते. 1999च्या वेळी विलासराव देशमुख साहेबांचा निवडणुकीत विजय झाला, त्यावेळी त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी बाजू धरून ठेवणारे एक प्रमुख नाव म्हणजे अहमद पटेल साहेब. त्यांच्यामुळे लातूरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले. असे असले तरी अहमद पटेल साहेबांनी याचा गाजावाजा कधी केला नाही. 'माझ्यामुळे हे झालं', असेही ते कधी म्हणाले नाहीत. त्यांची एकच भूमिका होती, पक्षाच्या वाढीसाठी, लोकांच्या समस्या सुटण्यासाठी चांगली माणसे योग्य पदावर असावीत. पुढची 15 वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री असण्यामागे अहमद पटेल साहेबांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख