भाजपच्या `यंग ब्रिगेड`ची अजितदादांशी टक्कर!

महाविकास आघाडी सरकारच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. जर असा प्रयोग झालाच तर याचा सर्वाधिक फटका भाजप बसू शकतो आणि भाजपची डोकेदुखी वाढू शकणार आहे.
murldhar mohol-jagdish mulik-hemant rasane
murldhar mohol-jagdish mulik-hemant rasane

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या निवडीनंतर भाजपने 'यंग ब्रिगेड'लाच मैदानात उतरवत आगामी काळातील अजेंडा निश्चित केला आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने हे पाऊल उचलले असले, तरी या यंग ब्रिगेडसमोर सर्वांत मोठे आव्हान असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे. तगडी प्रशासकीय पकड आणि संघटनेला उभारी देणारा नेता म्हणून परिचित असलेल्या पालकमंत्री अजितदादांचा सामना यंग ब्रिगेड कशी करणार? याची उत्सुकता पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

पुणे महापालिकेच्या महत्त्वांच्या पदांसाठी भाजपने युवा नेत्यांना संधी देत महापौरपदी मुरलीधर मोहोळ, सभागृह नेतेपदी धीरज घाटे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासने यांना संधी दिली. त्यातच आज शहराध्यक्ष म्हणून मुळीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.  दोन वर्षांच्या कालावधीत पुणे महापालिकेची निवडणूक आहे. यात सत्ताधारी भाजपला सत्ता राखण्याचेच नव्हे तर २०१७ प्रमाणे कामगिरी करण्याचे तगडे आव्हान आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात 2017 मध्ये झालेल्या या निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे नगरसेवकांची शंभरी गाठली होती. तीच कामगिरी करण्यासाठी भाजपच्या या नव्या शिलेदारांना झगडावे लागणार आहे. कारण आताच्या घडीला राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार असून अजित पवार यांच्यासारखे झपाटून काम करणारे पालकमंत्री पुण्यात आहेत. त्यामुळे ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेच्या माध्यमातून निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करताना राजकीयदृष्ट्या संघटना मजबूत करण्यासाठी भाजपला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

अजित पवार यांच्या कामाची पद्धत आणि गती पाहता भाजपालाही आता आक्रमक आणि वेगाने पुढे जावे लागणार आहे. २०१७ च्या यशात प्रदेशाची 'रसद', तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांचे नियोजन आणि एकूणच भाजपबद्दल असलेली सकारात्मक लाट असणारी स्थिती होती, मात्र आगामी काळात अशी स्थिती नसणार आहे. उलट अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर लागलीच बैठकांचा धडका लावत विकासकामांचा आढावा घेतला आहे.

येत्या काहीच दिवसात अजितदादांचा मोर्चा पक्ष संघटना मजबूत करण्यातकडे वळणार हे वेगळे सांगायला नको. त्यातच वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि थोडक्यात हुकलेल्या खडकवासल्यासह तीन विधानसभा मतदार संघांवर राष्ट्रवादीकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत पक्ष सोडलेल्या आणि भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांवरही राष्ट्रवादीची नजर असणार आहे. अशा नगरसेवकांना थांबवताना भाजपची दमछाकही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच चार नगरसेवकांची प्रभागपद्धत महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्यानंतर वॉर्डपातळीवर भाजपला तगडे उमेदवार शोधावे लागतील. कारण वॉर्डपद्धतीत निवडणूक जिंकण्याचा राष्ट्रवादीचा हातखंडा सर्वश्रुत आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर 2022 च्या महापालिका निवडणुकीत यंग ब्रिगेडलाही तोडीस तोड उत्तर द्यावे लागणार आहे. भाजपमध्ये पुण्यात या आधी गोपीनाथ मुंडे विरुद्ध नितीन गडकरी गट अशी गटबाजी दिसून येत होती. त्यात पक्षाचे नुकसान झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असले तरी  आता सध्यातरी राज्यात  देवेंद्र फडणवीस यांचीच संघटनेवर पकड आहे.  पुण्यात भाजपकडून विविध पदांवर असलेली तरुण मंडळी ही त्यांच्याच जवळची मानली जातात. त्यामुळे अजित पवारांच्या डावपेचाला ही मंडळी टक्कर देणार की अजितदादा त्यांना मोडीत काढणार, याची उत्सुकता राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com