आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ - योगिता वरखडेची गरुडझेप   

आर्थिक बाबीमुळे पीएचडी करण्याचा माझा निर्णय काही काळासाठी थांबवणार होते. मात्र आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी माझा हुरूप वाढवून आर्थिक मदत केली .-योगिता वरखडे
ashramshala-to-Michigen
ashramshala-to-Michigen

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडेला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती देऊन हातभार लावला आहे. 

योगिताप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सूरज आत्राम या आदिवासी विद्यार्थ्यास इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला असून त्याच्या पंखांना बळ देण्याची जबाबदारी विभागाने  घेतली आहे.

शेती आणि मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असलेल्या आदिवासी कुटुंबात शालेय शिक्षण पूर्ण करणे हीच मोठी कामगिरी मानले जाते. मुख्य शहरापासून दूर अंतरावर असल्याने उच्च शिक्षणासाठी गावाबाहेर पडणे हे आदिवासी तरुणांसमोर मोठे आव्हान असते. बेताची आर्थिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्थेची  वानवा, घर ते आश्रमशाळांपर्यंतचा मैलोनमैलाचा प्रवास असे अडथळे आदिवासी तरुणांसाठी कायम असतात.  

मात्र या आव्हानांना पार करत  योगिता वरखडे या २८ वर्षीय तरुणीने  उच्च शिक्षण पूर्ण केले असून परदेश शिक्षणासाठी तिचा प्रवास सुरु झाला आहे. अमेरिकेतील मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत योगिताची पीएचडीसाठी निवड झाली असून आदिवासी विकास विभागामार्फत तिच्या परदेशातील शिक्षण आणि राहण्याच्या खर्च करण्यात येणार आहे.  योगिता ही तिच्या कुटुंबातील चौथी मुलगी असल्याने समाजातून अवहेलना सहन करावी लागत होती. मात्र योगिताच्या कुटुंबीयांनी या अवहेलनेला आव्हान देऊन आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केले.

" आर्थिक बाबीमुळे पीएचडी करण्याचा माझा निर्णय काही काळासाठी थांबवणार होते. मात्र आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी माझा हुरूप वाढवून आर्थिक मदत केली यामुळे माझे स्वप्न पूर्ण होणार आहे.  आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत  पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पीएचडी पूर्ण झाल्यावर गावातील आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करायचे आहे", असे योगिता वरखडे हिने सांगितले.

आदिवासी विकास विभागाने पांढरकवडा येथील सुरज आत्राम या विद्यार्थ्याला खास शिष्यवृत्ती प्रदान केली असून शेफील्ड युनिव्हर्सिटीत आण्विक ऊर्जा आणि जैव तंत्रज्ञान या विषयावर पीएचडीसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असणाऱ्या पालकांनी सूरजला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले असून त्यांचे प्रोत्साहन आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्यामुळे पीएचडीचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सुरज आत्राम याने सांगितले. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेती प्रक्रियेत येणारी आव्हाने दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सुरजने सांगितले.

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या परदेशी अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही आदिवासी विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि पीएचडीसाठी उपयुक्त ठरणार आहे. उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अशी शिष्यवृत्ती देण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे, या संधीचा आदिवासी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.

 दुर्गम भागात राहून उच्च शिक्षणासाठी पात्र ठरलेले हे विद्यार्थी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठरले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com