Yogi Adityanath"s selection a surprise | Sarkarnama

 योगी आदित्यनाथ यांची निवड एक गूढ 

नवी दिल्ली : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 एप्रिल 2017

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पसंत आदित्यनाथ ही होती. अमित शहांचा शब्द ज्याप्रमाणे गुजरातमध्ये अंतिम ठरला तसाच तो उत्तर प्रदेशातही ठरला! 

उत्तर प्रदेशातील प्रचंड जनादेशानंतर तेथील मुख्यमंत्रिपदासाठी नरेंद्र मोदी कुणाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. 
अचानक योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेकांचे डोळे अचंब्याने विस्फारले. 

आदित्यनाथ हे वादग्रस्त आहेतच; परंतु कट्टर हिंदुत्वाचा शिक्का त्यांच्यावर असताना त्यांची नेमणूक कशी झाली, याबाबतच्या चर्चेला अजूनही विराम मिळालेला नाही. 

असे सांगतात, की मोदींनी दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांच्या नावाला पसंती दिली होती. सिन्हा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले देखील जात होते; 
पण असे काय घडले की सिन्हा यांचा पत्ता कटला ? 

कारण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पसंत आदित्यनाथ ही होती. अमित शहांचा शब्द ज्याप्रमाणे गुजरातमध्ये अंतिम ठरला तसाच तो उत्तर प्रदेशातही ठरला! आदित्यनाथ यांची निवड सर्वार्थाने चकित करणारी आहे कारण गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराचे पुजारी असलेले आदित्यनाथ, त्यांचे गुरू महंत अवैद्यनाथ आणि त्यांचेही गुरू महंत दिग्विजयनाथ ही मंडळी ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ना भाजपशी संबंधित आहेत. मूलतः ही मंडळी हिंदू महासभेची आहेत. महंत अवैद्यनाथ यांनी पहिली लोकसभा निवडणूक हिंदू महासभेतर्फेच लढविली होती आणि भाजपने त्यांना पाठिंबा दिलेला होता. 

त्यांची ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतल्यानंतरच त्यांना भाजपने आणि त्यातही मोदींनी कसे स्वीकारले, याचा खात्रीशीर खुलासा होऊ शकलेला नाही. 
योगीसाहेबांना भाजप विधिमंडळ पक्षात 200 आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांची निवड करावी लागली असा एक तर्कही दिला जात आहे; पण ज्या योगींना उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भात फारशी जबाबदारी दिलेली नव्हती, ते नाराज होते, त्यांनी त्यांच्या हिंदू युवा वाहिनीतर्फे वीस-पंचवीस जणांना स्वतंत्र उभे करण्याचेही ठरवले होते. मग असे सर्व असताना मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात कशी, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. येणारा काळच त्याचे उत्तर देईल. 

पण, उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहांचा शब्द अखेरचा मानला गेला असेल, तर महत्त्वपूर्ण व सूचक आहे. गुजरातमधील नेतृत्वबदल, म्हणजेच आनंदीबेन पटेलना काढणे व त्यांच्या जागी विजय रूपानी यांना मुख्यमंत्री करणे यामध्ये देखील शहांचा शब्द अंतिम राहिला होता. म्हणजे मोदी यांच्या बरोबरीने शहांचे वजन वाढत आहे, असा निष्कर्ष तर यातून निघत नाही? 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख