गिरीश बापटांशी पंगा घेतल्याने गोगावलेंच्या पदावर संक्रांत?

गिरीश बापटांशी पंगा घेतल्याने गोगावलेंच्या पदावर संक्रांत?

पुणे : लोकसभा निवडणुकीपासूनचे खासदार गिरीश बापट यांच्याशी छुपे राजकीय वैर, आमदरांसोबतची ताठर भूमिका, महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढवून ओढवून घेतलेली नाराजी, ठराविक नगरसेवकांशी जवळीक या साऱ्या बाबींमुळेच पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले यांना शहराध्यपद गमवावे लागल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोगावले यांच्याबाबतची नाराजी परवडणारी नसल्यानेच गोगावलेंची गच्छंती झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुदत संपभलल्याने गोगोवले यांच्याजागी आमदार माधुरी मिसाळ यांची नेमणूक केल्याचा खुलासा पक्षश्रेष्ठी करीत आहेत.

दरम्यान, नव्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी सायंकाळपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. "माझे नाव निश्‍चित झाले आहे. परंतु, घोषणा झालेली नाही, असे मिसाळ यांनी सांगितले. 

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीआधी गोगावले यांची शहराध्यपदी निवड झाली. त्यानंतर महापालिका आणि लोकसभेच्या निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. दोन्ही निवडणुकांत भाजपाला प्रचंड यश मिळाले. त्यामुळे पक्ष संघटनेसह श्रेष्ठींकडे गोगावलेंचा दबदबा वाढला. भाजपचे चाणाक्‍य अर्थात, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नजरेतही आपली कामिगरी ठळकपणे दिसेल, याची व्यवस्था गोगावले यांनी केली होती.

पक्ष विस्तारासाठी नवे कार्यक्रम आखून गोगावले यांनी शहा यांच्याशी जवळीक वाढविली होती. ती लोकसभा निवडणुकीत आपल्या पथ्यावर पडेल, या आशेने गोगावले यांची दिल्लीवारी वाढली होती. तेव्हाच, लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून गोगावलेंचे नाव चर्चेत आले. मात्र, पक्षातील हेडमास्तर म्हणजे पालकमंत्री गिरीश बापट यांनीच दंड थोपटल्याने गोगावले "बॅकफूट' वर आले. तेव्हापासून बापट, गोगावले यांच्यात दुरावा निर्माण झाला. लोकसभा निवडणुकीआधी भलत्याच उत्साहात दिसणारे गोगावले ऐन निवडणुकीत नाराज असल्याची चर्चा होती.

बापट यांच्या नाराजीसह गोगावलेंबाबत शहरातील अन्य आमदारांकडून तक्रारींचा पाढा असायचा. पक्षाच्या बैठका, कार्यक्रम आणि वरिष्ठा नेत्यांच्या पत्रकार परिषदांबाबत गोगावलेंकडून निरोप मिळत नसल्याचा आक्षेप आमदारांचा आहे. केवळ "एसएमएस' करून निरोप दिले जात. मात्र, ते फोन करून विश्‍वास घेत नसल्याचा ठपका आमदार ठेवतात. त्यामुळे पुण्यातील भाजपच्या आठही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांकडे गोगावलेंच्या तक्रारी केल्या होत्या.

त्याचवेळी महापालिकेतील नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन आणि त्यांच्यावर वचक राहावा, या उद्देशाने गोगावलेंनी सुरवातीला महापालिकेत ऊठबस वाढविली. त्यानंतर पदाधिकारी-नगरसेवकांच्या बैठकांचा सपाटा लावला, स्थायीच्या बैठकीला आपल्या खास मर्जीतील व्यक्ती पाठवून "हिशेब' ठेवण्याची सोय गोगावले यांनी केली आहे. अगदी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून नगरसेवकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली. त्यावरून पक्षातील नेत्यांसह सर्वच पातळ्यांवर गोगावले यांच्यावर टीका झाली. तरीही या पदावर आपणच कायम राहू या आत्मविश्‍वासाने वावरणाऱ्या गोगावलेंना अखेर झटका बसला असून, त्यांच्याकडील शहराध्यक्षपद आता मिसाळ यांच्याकडे जाणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com