महाविद्यालयीन निवडणुकीत 'यिन'ची भूमिका महत्त्वाची :विद्यार्थी कायद्यात बदल केल्याची विनोद तावडे यांची माहिती - YIN Will Play Major Role in College Elections Vinod Tawde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

महाविद्यालयीन निवडणुकीत 'यिन'ची भूमिका महत्त्वाची :विद्यार्थी कायद्यात बदल केल्याची विनोद तावडे यांची माहिती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई : विद्यार्थी कायद्यांत बदल करण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेता येणार आहेत. या निवडणुकांमध्ये 'यिन'चे प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करा, पण राजकारणात या, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.

मुंबई : विद्यार्थी कायद्यांत बदल करण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेता येणार आहेत. या निवडणुकांमध्ये 'यिन'चे प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करा, पण राजकारणात या, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.

तावडे यांनी यावेळी भाषणाच्या नेहमीच्या पद्धतीला टाळून थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत संवाद साधला. राजकारणातील गुणवत्तेसाठी आणि चांगल्या व्यवस्थेसाठी तरुणांनी राजकारणात येण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी यिनचे व्यासपीठ तुम्हाला प्रेरणा देईल, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित तरुणांचा आत्मविश्‍वास वाढविला. यावेळी तावडे यांनी 'यिन' प्रतिनिधींना शपथ दिली. शिक्षण क्षेत्रात सतत होत असलेल्या बदलांविषयी 'यिन' सदस्यांनी विचारलेल्या शंकांना तावडे यांनी समर्पक उत्तरे देत परिस्थिती समजावून सांगितली.

तावडे म्हणाले, मी 75 टक्‍के शिक्षणमंत्री आणि 25 टक्‍के शिक्षक मंत्री आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी मी जबाबदार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करत असल्याने शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदारांचा रोष पत्करावा लागत असल्याचा टोला त्यांनी मारला. शिक्षक भरती करताना शाळा संस्थापक दहा लाख रुपये घेतात. हे थांबवण्यासाठी शिक्षकांची परीक्षा राज्य सरकार घेईल. त्यातील गुणवत्तेनुसार त्या शिक्षकांना नोकरीवर ठेवावे लागेल, हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. साहजिकच संस्थाचालक नाराज झाले. पण व्यवस्था सुधारायची तर अशा प्रकारची नाराजी ओढवून घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन पेपर तपासणीत गोंधळ झाल्याचे मान्य करत त्यावरून संबंधितांवर कारवाईही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणातील तांत्रिक बाबींवरही यानिमित्ताने तावडेंनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, ''अनेक महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित तुकड्या आहेत, जिथे तासावर प्राध्यापक शिकवतात. असे शिक्षक जवळपास दोन लाख आहेत; तर कायमस्वरूपी प्राध्यापक अडीच लाख आहेत. तासावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना पेपर तपासण्याची परवानगी नसते. त्यामुळे सॉफ्टवेअर तयार करताना अडीच लाख प्राध्यापकांचे लॉग इन तयार झाले, तेवढेच प्राध्यापक पेपर तपासू शकत होते. परिणामी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांचे प्रमाण कमी झाले.'' त्यामुळेच तासावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांना पेपर तपासण्याची परवानगी देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख