yin satara | Sarkarnama

"यिन'च्या "समर यूथ समिट"ला दिमाखात सुरवात 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

"सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' आणि स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत "यिन समर यूथ समिट-2017' पॉवर्ड बाय नीलय ग्रुप या उपक्रमाला गुरुवारी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात सुरवात झाली.

सातारा : "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' आणि स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत "यिन समर यूथ समिट-2017' पॉवर्ड बाय नीलय ग्रुप या उपक्रमाला गुरुवारी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात सुरवात झाली. तरुणाईचे व्यक्‍तिमत्त्व खुलविणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमाचे उद्‌घाटन रयतचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते झाले. जीवनातील यशाचा मार्ग शोधण्यासह उद्योजकता, अभिनय क्षेत्रातील करिअरच्या वाटांवर तज्ज्ञांनी दिवसभरात मार्गदर्शन केले. या समिटमध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून कॉलेजचे युवक-युवती सहभागी झाल्या आहेत. 

यावेळी शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उद्योजक कौस्तुभ फडतरे, "सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, "यिन' मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री अनिकेत मोरे, "यिन'मंडळाचे राज्याध्यक्ष अजिंक्‍य शेवाळे आदींची उपस्थिती होती. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, "सीड' इन्फोटेक, सीडीएसएल, सह्याद्री फार्म यांचेही उपक्रमासाठी सहकार्य लाभले. 

जागतिकीकरणाच्या युगात बुद्धीला किंमत आली आहे. तुम्ही "डिजिटल चाईल्ड' आहात. गुणवत्ता दाखवा आणि मागेल ते मिळवा, ही परिस्थिती सध्या आहे. पुढील काही वर्षांत जगाला कामासाठी हात देणारा एकमेव भारत देश असेल. त्यामुळे जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला पाहिजे, त्या जागेवर जाऊन तुम्ही राज्य करू शकता. त्यासाठी तुमच्यातील क्षमता सिद्ध करावी लागेल, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले. 

डॉ. पाटील म्हणाले, अमेरिकास्थित सर्व भारतीयांनी अमेरिका सोडायची ठरविल्यास अमेरिका एक दिवस जगू शकणार नाही. "नासा'ही बंद राहील. 2022 मध्ये चीन, भारत, अमेरिका ही राष्ट्रे, तर त्यापुढे चीन आणि भारत हीच राष्ट्रे महासत्ता असतील.'' 

डॉ. सुहास माने म्हणाले, "" "सकाळ'ने सामाजिक जाणीव निर्माण करणारे व्यासपीठ उभे केले आहे. युवकांत जगण्याची, आयुष्याला कलाटणी देणारी क्षमता असते. युवकांनी मानसिक, शारीरिक शक्‍तीवर काळाला आव्हान द्यावे.'' 

प्राचार्य कानडे म्हणाले, ""आधुनिक महाराष्ट्र घडविण्याची उमेद युवकांत आहे. "यिन'च्या माध्यमातून युवकांची सामाजिक जडण-घडण होत आहे. उद्याच्या महाराष्ट्रात आम्ही कोठे असणार आहोत, यासाठी यूथ समिट मधून मार्गदर्शन मिळेल.'' श्रीकांत कात्रे यांनी प्रास्ताविक केले. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश निंबाळकर यांनी आभार मानले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख