"..आबा, तुम्ही आज पाहिजे होता.."

विधानसभेच्या निवडणुकीनंतर सभागृहात विरोधी बाकावरून त्यांनी केलेलं भाषण आजही लोकांना आठवल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या त्या राजकीय भाषणात अनेक चौकार आणि षटकार ठोकले.
3RR_Patil1.jpg
3RR_Patil1.jpg

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलुख मैदान तोफ, प्रचाराच्या आखाड्यात विरोधकांना आपल्या शालीन भाषेनं चितपट करणारे, साधेपणा हा आयुष्यातील मोलाचा दागिना आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचा आज स्मृतिदिन. शेवटपर्यंत सामान्य जनतेत राहून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आबा प्रयत्न करीत राहिले. कायम पाय जमिनीवर ठेवून आपली वाटचाल करीत राहिलेला नेता, अशी ओळख त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. "..आबा तुम्ही आज पाहिजे होता.." अशीच सर्वसामान्यांची भावना आहे.

स्पर्धेत अनेक राजकीय दिग्गज असताना, आपली वेगळी पायवाट काट्याकुट्यातून, दुःखातून, अडचणीतून धुंडाळत आपला प्रवास शोधणारे व गरिबीचं कधीही भांडवल न करणारे, शरद पवार यांच्या छायेत वावरत ते सांगली जिल्हा परिषद ते राज्याचे उपमुख्यमंत्री असा प्रवास करणारे आर. आर. पाटील. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर सभागृहात विरोधी बाकावरून त्यांनी केलेलं भाषण आजही लोकांना आठवल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या त्या राजकीय भाषणात अनेक चौकार आणि षटकार ठोकले.  

१६ ऑगस्ट १९५७ ला सांगली जिल्हातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर आर पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं. शाळकरी वयातच प्राचार्य पी. बी. पाटील यांचं मार्गदर्शन आबांना मिळालं. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झाले. पुढे एलएलबीही झाले. पण वकिलीमध्ये फार काही यश मिळालं नाही.

एक शिकलेला तरुण, समाजात बद्दल घडवण्याची जिद्द असलेला तरुण ही तासगाव परिसरात त्यांची ओळख होतीच. त्यामुळेच सांगली जिल्ह्यातील दिगग्ज नेते वसंतदादा पाटील यांनी पहिल्यांदा आर. आर. पाटील यांना हेरले व राजकारणात आणले. शरद पवार यांचेही आबांना आशीर्वाद मिळाले. त्या जोरावरच जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला. 

आबांची भाषण म्हणजे राजकीय जाणकारांसाठी एक मेजवानीच असायची. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव असे नेते होते जे लाखोंचा घोळक्याला आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करीत खेळवून ठेवत होतं. आणि त्या सभेमध्ये एकच चर्चा  असायची आज आंबानी मैदान मारले. आपल्या भाषणामध्ये कधीही आबांनी मर्यादा ओलांडल्या नाहीत अनेक वेळा त्यांच्यावर विरोधकांनी खालच्या पातळीवर टीकाही केली पण त्यांनी कधी स्वतःचा संयम ढळू दिला नाही. समोरच्याचा अतिशय शेलक्या शब्दात समाचार घेऊन त्याच्या मनाचा ठाव घेणे हे फक्त आबांना जमायचं. 

आबांनी जे जे पद भूषवले त्या त्या  पदाला योग्य न्याय देण्याचा पर्यँत केला. विरोधी पक्षनेते असताना सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आबांच भाषण म्हटलं की धडकीच भरायची. आजही ती कोणावर धडकणार याची सर्वांना उत्सुकता असायची. टीका करताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो विषय सर्वसामान्यांनाही समजेल, अशी त्याची मांडणी करून सत्ताधारी पक्षावर प्रचंड शाब्दिक हल्ला करायचा हे आबांचं ठरलेले सूत्र. 

आज पोलिस दलात आबांचे अतिशय आदराने नाव घेतले जाते. कारण या पोलीस दलामध्ये क्रांतिकारक जर कोणी बदल केले असतील, ते आबांनीच केले. पोलीस दलातील भ्रष्टाचार त्यांनी संपवला, लाखो कर्मचाऱ्यांची त्यांनी भरती करून तरुणांना रोजगार दिला. आर्थिक गुंतवणूक करून पोलीस दल आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्राम योजना, अत्यंत कमी खर्चात राबवली या योजनचेही महाराष्ट्रत  दूरगामी परिणाम झाले.

त्याचबरोबर महाराष्ट्रात केलेली डान्सबार बंदी या क्रांतिकारक निर्णयाने अनेकांच्या विरोधाला त्यांना सामोरे जावे लागले पण त्याची भीड न बाळगता या महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहिला पाहिजे व येथील तरुण व्यसनाधीन न होता रोजगारी झाला पाहिजे, असा त्यांचा अट्टहास होता. त्यामुळे त्यांनी अत्यंत तळमळीने डान्सबार हा कायदा केला, असे अनेक निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासात आबांचं योगदान नक्कीच मोलाचा वाटा आहे, असे आपणाला म्हणता येईल.

आयुष्यात चढ-उतार अनेक आले. आईृ-वडिलांनी प्रचंड कष्ट घेऊन आबांना मोठे केले. त्यामुळे आंबानी सर्वसामान्य जनतेला कधीच आपल्यापासून दूर केले नाही. शेवटपर्यंत सामान्य जनतेत राहून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करीत राहिले. सत्तेच्या धुंदीत त्यांनी कधीही स्वतःला हरवलं नाही. कायम पाय जमिनीवर ठेवून आपली वाटचाल करीत राहिलेला नेता अशी ओळख त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. आबा, तुम्ही आज पाहिजे होता.. अशीच सर्वसामान्यांची भावना आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com