yin kolhapur | Sarkarnama

भीती झुगारून द्या, भविष्य घडेल ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मे 2017

अपयश आले म्हणून खचून न जाता सरावात सातत्य ठेवा आणि पाहा अवघे आकाश तुमचे असेल. इतरांना सन्मान देत राहाल, तर तुमच्या वर्तमानावर सुंदर आयुष्य आकार घेईल, असा मौलिक उपदेश क्‍त्यांनी येथे केला. 

कोल्हापूर : शिवचरित्र केवळ जयजयकारासाठी नव्हे, तर डोक्‍यात घेऊन जीवनाचा प्रवास करण्याचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणे भीती झुगारून द्याल तरच भविष्य घडेल. अपयश आले म्हणून खचून न जाता सरावात सातत्य ठेवा आणि पाहा अवघे आकाश तुमचे असेल. इतरांना सन्मान देत राहाल, तर तुमच्या वर्तमानावर सुंदर आयुष्य आकार घेईल, असा मौलिक उपदेश क्‍त्यांनी येथे केला. 

डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित "समर यूथ समीट'चा समारोप झाला. दिवसभरात विविध वक्‍त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रेरणा दिली. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत "समीट'चा समारोप झाला. स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्या प्रबोधिनी यांचे सहप्रायोजकत्व होते. वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये समीट झाले. यिन समन्वयक सूरज चव्हाण याने संयोजन केले. 

प्रत्येक स्पर्धा खूप शिकवणारी 
रेश्‍मा माने (आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू)
माझे मार्गदर्शन करण्याचे वय नाही. तरीही कुस्ती प्रवासाबद्दल थोडे सांगते. वयाच्या चौथ्या वर्षांपासून मी कुस्तीला सुरुवात केली. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे, या वडिलांच्या इच्छेने मी कुस्तीत ओढले गेले. सहावीला असताना पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळले. त्या वेळी पैलवानकीचा आहार घ्यायचे. खूप सराव करायचे. कुस्ती व शाळेचा मेळ साधताना त्रास व्हायचा. कुस्ती नको वाटायची. यश मिळवत गेल्यानंतर आत्मविश्‍वास वाढत गेला. इंडियाचा कोट घालताना खूप आनंद झाला. स्पर्धेसाठी हरियाना, दिल्लीला जावे लागले. एकदा तर वडिलांकडे थोडे पैसे कमी पडल्याने विमानात बसायची संधी हुकली. वडिलांच्या प्रोत्साहनाने नववीला असताना पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनिमित्त विमानात बसायची संधी मिळाली. पहाटे चार वाजता उठून सरावाला सुरुवात होते. आठवड्यातून दोन वेळा जिम करावी लागते. स्पर्धेबाबत सांगायचे, तर परदेशातील कुस्तींपटूंविरोधात टिकू शकू की नाही, याचा तणाव असतो. तो कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. अपयश येते, म्हणून खचायचे नाही. सरावात सातत्य ठेवले तर खूप काही शक्‍य होते. 


संघर्ष संपवून भरारी घेण्यासाठी गडकोट धुंडाळा 
डॉ. अमर अडके (दुर्ग अभ्यासक) 
प्रेरणा गडकोटांच्या ठायी-ठायी विसावल्या आहेत. सह्याद्रीच्या अंतरंगात त्या वसल्या आहेत. या प्रेरणा घेऊन जीवनाचा प्रवास केला, तर देशाच्या विकासास त्या पूरक ठरणार आहेत. त्या कळण्यासाठी मात्र काही गोष्टी अनुभवातून समजून घ्याव्या लागतात. तुम्ही कधी मातीत लोळले आहात, तुमचे गुडघे फुटले आहेत का, किल्ल्याची परिक्रमा कधी केली आहेत का, पन्हाळा-पावनखिंड मोहीम चालत पूर्ण केली आहे का, विंचू चावलाय काय? याचा अनुभव घेतला असेल, तर जीवनात आपण खूप काही शिकल्यासारखे आहे. शिवचरित्र का अभ्यासायचे, याचे उत्तर शोधण्याचा तो एक राजमार्ग आहे. लक्षात ठेवा की, बंद पुस्तकाच्या पलीकडेही आयुष्य आहे. 

इच्छा कागदावर उतरवून लक्ष केंद्रित करा 
नीलय मेहता (संस्थापक, नीलय ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट) 
कुणाला बाईक, मर्सिडीज, तर कुणाला ऑडी घेण्याचे स्वप्न आहे. कुणाला अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे बनायचे आहे. जीवनाची असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जो तो धडपडतोय. आयुष्य मस्तीत जगण्यासाठी मात्र सुंदर शिक्षण हवे असते. मी घडल्यानंतर समाजालाही घडविणार, ही प्रवृत्ती अंगी बाणवावी लागते. माणसाचे भविष्य त्याच्या वर्तमान काळावर ठरते. माणूसच स्वत:ला बदलू शकतो. वाल्याचा वाल्मिकी बनू शकतो, तर मग आपणही हव्या त्या पद्धतीने घडू शकतो. कारण आपल्यात प्रचंड क्षमता आहेत. तुमचे आई-वडील तुमच्यात स्वप्नं बघत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख