युवकांनो, तुमच्या सकारात्मक ऊर्जेने बदल घडेल !  - yin kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

युवकांनो, तुमच्या सकारात्मक ऊर्जेने बदल घडेल ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मे 2017

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रकाश पवार "तरुणाई आणि राजकारण' विषयावर म्हणाले, ""राजकारण हे करिअरचे क्षेत्र आहे, असा समज संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभरात आहे. जे जे तरुण राजकारणाला करिअर म्हणून पाहायला हवे, असे मानतात. मात्र तसे होऊ शकत नाही.' 

कोल्हापूर : राजकारणाकडे करिअर म्हणून न पाहता सामूहिकतेचा पुरस्कार करा. डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन सामूहिक भावना बळकट करा. मित्रांनो, तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ठेवून काम केल्यास तुमच्या सकारात्मक ऊर्जेने समाजात बदल नक्कीच घडेल, असा सूर विविध वक्‍त्यांच्या संवादातून व्यक्त झाला. निमित्त होते डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित "समर यूथ समीट'चे. 

स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्याप्रबोधिनी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र यांचे सहप्रायोजकत्व आहे. वि. स. खांडेकर भाषाभवनात त्यास सुरवात झाली. 

महापालिकेचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते समीटचे दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन झाले. या वेळी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टचे राजू मेवेकरी, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, यिनचे महाराष्ट्र प्रमुख तेजस गुजराथी, यिन मुख्यमंत्री अनिकेत मोरे, क्रीडामंत्री तेजस्विनी पाटील उपस्थित होते. 

रांजना ग्रुप इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक जयसिंग चव्हाण यांनी "झिरो टू मिलियन सक्‍सेसफूल बिझनेस' विषयावर संघर्षपूर्ण वाटचालीतून साधलेल्या यशाचे गमक स्पष्ट करत तरुणाईला प्रेरणा दिली. 

ते म्हणाले, ""अठरा महिन्यांचा असताना असताना डॉक्‍टरांनी चुकीचे इंजेक्‍शन दिल्याने मी दोन्ही पाय गमावले. अठरा वर्षे घरीच होतो. त्यानंतर थेट दहावीची परीक्षा दिली आणि किड्या-मुंग्याप्रमाणे मरायचे नाही, हे ठरवून टाकले. डिटर्जंट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. समाजकल्याण विभागाकडे 70 हजार रुपयांच्या निधीसाठी अर्ज केला. मात्र केवळ वीस हजार रुपयेच मिळाले. ते स्वीकारून व्यवसायास सुरवात केली. कमी दरात उत्कृष्ट दर्जाचा माल देत राहिलो. माझ्या फॅक्‍टरीला आग लागल्यानंतरही स्थिर राहिलो.'' ते म्हणाले, ""सुमारे तीन हजार दिव्यांग लोकांसाठी ई-रिक्षा देऊन त्यांना स्वावलंबी बनविणार आहे. या रिक्षात फोटो स्टुडिओ, झेरॉक्‍स सुविधा असणार आहे. दिव्यांगांना करुणेची गरज नसून रोजगाराची आहे.'' 

याहूस डिजिटल मार्केटिंगचे संस्थापक सुजय खांडगे "डिजिटल मार्केटिंग' विषयावर म्हणाले, ""सोशल असो की प्रोफेशनल कनेक्‍ट, त्याची सुरवात डिजिटलपासून होते. नवी पिढीने डिजिटलबाबत प्रिपेअर असायला हवे. डिजिटल मार्केटिंग ऍट्रॅक्‍टिव्ह तितकेच डिस्ट्रॅक्‍टिव्ह आहे. डिजिटलवर तुम्ही काय लाइक करता, काय कमेंट करता, हे मित्रांपुरते मर्यादित असत नाही. दुसरीत शाळा सोडलेला 58 वर्षांचा माणूस मोबाईलवर ऍप डाऊनलोड करतो, तेव्हा त्याच्यातील सोशल चेंज लक्षात घेणे आवश्‍यक आहे.' 

सुप्रसिद्ध सल्लागार डॉ. राम गुडगीला यांनी "टीम बिल्डिंग' विषयावर बोलताना म्हणाले, ""आपल्या समाजात मुलगा अठरा वर्षांचा झाला, तरी अजून तू लहान आहेस, असे म्हणण्याचा पगडा आहे. अठरा वर्षानंतरच्या आयुष्यात मात्र दोन प्रकार पडतात. त्यात आयुष्यात मोठे होण्याचे स्वप्न पाहणारा एक गट असतो, तर दुसरा एकटेपणाने जगण्यातल्या असतो.' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख