yavatmal-madan-yerawar-sanjay-rathod | Sarkarnama

यवतमाळ : पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडून शिवसेना नेते `टार्गेट'? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कामगार कार्यालयातील निरीक्षकाला कथित मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांना मंगळवार (ता.31) पोलिसांनी अटक केली. त्यावरुन संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी यामागे पालकमंत्री मदन येरावार यांचा दबाव असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.

यवतमाळ : कामगार कार्यालयातील निरीक्षकाला कथित मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांना मंगळवार (ता.31) पोलिसांनी अटक केली. त्यावरुन संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी यामागे पालकमंत्री मदन येरावार यांचा दबाव असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. यावरून शिवसेना व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. 

अटल विश्‍वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात असंघटित कामगारांची नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये कामगार नोंदणी करण्यात आली आहे. यवतमाळ पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने या ठिकाणी नोंदणी मेळावा घेण्यात आला नाही. याचा जाब विचारण्यासाठी संतोष ढवळे कामगार कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी बोलताना संबंधित अधिकाऱ्यांच्या हातातील भ्रमणध्वनी खाली पडला. 

या घटनेनंतर पालकमंत्री स्वत: कामगार कार्यालयात गेले. त्यांनी तक्रार देण्यासंदर्भात दबाव टाकल्यानंतरच अधिकाऱ्यांनी संतोष ढवळे यांच्याविरोधात तक्रार दिल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला. 

भाजप पदाधिकाऱ्यांचा वापर करून कामगारांची नोंदणी करीत आहे. सामाजिक काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असून, शहरातील माफीयांवर वरदहस्त ठेवला जात असल्याचा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला. 

केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गेल्यापासून भाजप व सेना कार्यकर्त्यांमध्ये चकमकी सुरू आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख