यवतमाळ जिल्हा - युती झाली तरच भाजप-सेनेला 'अच्छे दिन'!

यवतमाळ जिल्ह्यात तळागाळातील कार्यकर्ता हेच कॉंग्रेसचे बलस्थान आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या माणिकराव ठाकरे, ऍड. शिवाजीराव मोघे व वसंत पुरके यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्यात पक्षाची हवाच गूल आहे. पालकमंत्री मदन येरावार, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या खांद्यांवर भाजपची धुरा आहे. भाजप-शिवसेना युतीने लढले तर 'अच्छे दिन' असतील; अन्यथा भाजपलाही निवडणूक सोपी नाही.
Sanjay Rathod - Manohar Naik - Shivajirao Moghe - Madan Yerawar - Ashok Uike
Sanjay Rathod - Manohar Naik - Shivajirao Moghe - Madan Yerawar - Ashok Uike

लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी लाट दिसून आली. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून प्रखर विरोधातही शिवसेनेच्या भावना गवळी पुन्हा खासदार झाल्या. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आमदारांचे 'जॉब कार्ड' तपासूनच जनता कौल देणार आहे. यवतमाळ विधानसभा भाजप आणि कॉंग्रेससाठी महत्त्वाची आहे. या मतदारसंघाचे आमदार पालकमंत्री मदन येरावार आहेत. यवतमाळ शहराचा पाणीप्रश्‍न, रस्त्यांची दुरवस्था यांसह अनेक समस्यांमुळे जनतेमध्ये संताप आहे. कॉंग्रेसला या वेळी तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे. युती झाल्यास संतोष ढवळे अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे. गेल्यावेळी त्यांनी मोठे आव्हान उभे केले होते. 

अनुसूचित जमातीसाठी राखीव राळेगावातून आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके आमदार आहेत. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासह 13 जणांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. डॉ. उईकेंची लोकप्रियता बघता कॉंग्रेसला सक्षम उमेदवार द्यावा लागणार आहे. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर निवडून आल्याने येथील समीकरण बदलले आहे. येथे वामनराव कासावार आणि संजय देरकर यांच्यासह 18 जणांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीनेही दावा केला असून, डॉ. महेंद्र लोढा इच्छुक आहेत. शिवसेनेकडे विश्‍वास नांदेकर, सुनील कातकडे; तर भाजपचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि मनसेकडून राजू उंबरकर तयारीत आहेत. 

केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांचा कार्यकाळ विविध घटनांनी वादग्रस्त राहिला. त्यामुळे त्यांना पक्षातूनच विरोध आहे. या वेळी भाजपकडे माजी आमदार संदीप धुर्वे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, उद्धव येरमे यांनी उमेदवारी मागितली आहे. कॉंग्रेसकडून ऍड. शिवाजीराव मोघे, त्यांचे पुत्र जितेंद्र, पुतणे विजय यांचीही तयारी सुरू आहे; परंतु मोघे पिता-पुत्रांना कॉंग्रेसमधूनच विरोध आहे. या मतदारसंघात गोंड समाज मोठ्या संख्येत असून, या वेळी गोंड समाजाचाच उमेदवार द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसमधूनच होत आहे. दिग्रसचे नेतृत्व महसूल राज्यमंत्री संजय राठोड करतात. माजी मंत्री संजय देशमुख कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे राठोड यांना प्रतिस्पर्धीच नाही. 

कॉंग्रेसकडे येथे सक्षम उमेदवार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वसंतराव घुईखेडकर यांची पुन्हा तयारी सुरू आहे. पुसद मतदारसंघ नाईकांचा गड आहे. या मतदारसंघावर महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. पुसदचे आमदार "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलू शकते. कॉंग्रेसकडे एकट्या महंमद नदीम यांनी उमेदवारी मागितली आहे; तर "राष्ट्रवादी'कडून इच्छुक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी जनसंपर्काची गती धीमी केल्याने नेमके चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमरखेड विधानसभेत भाजपचे राजेंद्र नजरधने आमदार आहेत. त्यांना या वेळी कॉंग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांचे आव्हान असणार आहे. भाजपचे युवा नेते भाविक भगत यांनीही लढण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे डॉ. विश्‍वनाथ विणकरे यांनी उमेदवारी मागितली आहे. 

आव्हान सर्वांनाच.......
2014च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत जिल्ह्यातील सातपैकी पाच जागा भाजपला, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. दरम्यान, पुलाखालून खूप पाणी गेलंय. मूलभूत नागरी समस्या व शेतकऱ्यांचे प्रश्‍न न सुटल्याने जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. सत्तेमुळे युतीचे बळ वाढले, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस "बॅकफूट'वर गेलेत. त्यामुळे पुन्हा जनादेश मिळविण्याचे आव्हान युतीसमोर जसे आहे, तसेच शक्ती दाखवण्याचे आव्हान दोन्ही कॉंग्रेससमोरही राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com