यवतमाळ जिल्हा बॅंक निवडणूक : सहकार क्षेत्रात महाविकास आघाडीसमोर भाजप पाय रोवणार का?

वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ताब्यात राहावी, यासाठी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अद्याप घोषणा केली नसली तरी विधानपरीषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पहील्या बैठकीत निवडणुक लढण्याचे निश्‍चित झाल्याची माहीती आहे. सहकार क्षेत्रावर भाजपची पकड नसली आणि तरी त्यांच्या सत्ताकाळात विद्यमान संचालकांपैकी निम्म्या संचालकांचा कल भाजपकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अनुभवी नेत्यांचा या निवडणुकीत कस लागणार असल्याचे बोलले जाते.
yavatmal district bank election will see tussle between mahavikas aghadi and bjp
yavatmal district bank election will see tussle between mahavikas aghadi and bjp

यवतमाळ : वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ताब्यात राहावी, यासाठी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अद्याप घोषणा केली नसली तरी विधानपरीषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पहील्या बैठकीत निवडणुक लढण्याचे निश्‍चित झाल्याची माहीती आहे. सहकार क्षेत्रावर भाजपची पकड नसली आणि तरी त्यांच्या सत्ताकाळात विद्यमान संचालकांपैकी निम्म्या संचालकांचा कल भाजपकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अनुभवी नेत्यांचा या निवडणुकीत कस लागणार असल्याचे बोलले जाते.

या निवडणुकीत पुर्वी उत्तमराव पाटील आणि मनोहर नाईक यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते रणनिती ठरवायचे. आता उत्तमराव पाटील नाहीत. त्यांच्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह ज्येष्ठ नेते व माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके रणनिती ठरवतील, असे सांगण्यात येते. आता महाविकास आघाडी लढणार असल्याने पालकमंत्री संजय राठोड त्यांच्या सोबत असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आजस्थितीत बळकट दिसतेय. यावेळी अनुभवी संचालकांना पत्ता कट होण्याची भीती आहे. त्यामधूनच आता एक मोठा गट सक्रिय झाला असून, वेगळा पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न या गटाकडून सुरू झाल्याची माहीती आहे. 

तब्बल 12 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालकांच्या पदांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होत आहे. यासाठी इच्छुकांची तयारी सुरू झालेली आहे. मात्र, एका प्रकरणावर येत्या 13 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यात काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय अंतिम मतदारयादी येत्या शनिवारी (ता.15) प्रसिद्ध होणार आहे. त्यात कोणत्या गटाचे किती मतदार? असतील, यावर पुढची रणनीती ठरविली जाईल.

महाविकास आघाडी होईल, असे सूतोवाच नेत्यांनी केलेले असले तरी ही निवडणूक अधिकृत पक्षांच्या चिन्हावर होणारी नाही. त्यामुळे पक्षापेक्षा या निवडणुकीत "गट' अधिक भारी पडणार आहेत. एकूण 21 संचालकांच्या पदासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्याचे सात संचालक कमी होणार आहेत. त्यातील अनेक जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत. याशिवाय, महाविकास आघाडी झाली, तर कुणाच्या वाट्याला किती जागा येणार, याचेही गणित लावले जात आहे. जागा कमी होणार असल्याने अनेकांनी सध्या "देव' पाण्यात बुडविले आहेत.

विद्यमान संचालकांपैकी अनुभवी व ज्येष्ठ संचालकांनी पर्याय उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत एका गटाची बैठक झाली. त्यात चाचपणी करण्यात आली. अनेक संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या गटाला बळ मिळाले. "सहकारात पक्ष नसतो' अशी बोलकी प्रतिक्रिया अनेक संचालकांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजप लढविणार पॅनेल !
महाविकास आघाडी होवो अथवा न होवो, पण यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजप फुल्ल इंटरेस्ट घेत आहे. अनेक गटांचा छुपा पाठिंबा मिळविण्यात विद्यमान अध्यक्षांना यश मिळाल्याची चर्चा आहे. विद्यमान संचालक मंडळासोबत त्यांचे असलेले "मधुर' संबंध निवडणुकीत कामी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पूर्ण पॅनेल लढविण्याची तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे.

नेत्यांची पाटी कोरी
जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची रिघ आहे. मात्र, सहकारात मोजक्‍याच नेत्यांचा बोलबाला आहे. अशा स्थितीत काही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निवडणुकीचे सूत्र आपल्या हातात घेण्याच्या तयारीत आहेत. याला संचालकांनी "नाक' मुरडले आहे. नेत्यांच्या हातात मतदार नसताना त्यांचा "इंटरेस्ट' का, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करून अनुभवी संचालक बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहीती आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीतील "छुपे' डावपेच हळुहळू उघड होतील. तोपर्यंत सर्वच "वेट ऍन्ड वॉच' भूमिकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com