यवतमाळमध्ये भाजपकडून राजकीय भूकंपाची रणनीती; आमदार, जिल्हाध्यक्षांची शहराबाहेर बैठक

मंत्रालय भाजपच्या हातून गेले असले तरी जिल्ह्याचे मिनिमंत्रालय पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.यासाठी 'अॅक्‍शन प्लॅन' भाजपने तयार केल्याची माहिती आहे. मिनिमंत्रालयासोबतच विधान परिषद पोटनिवडणूक जिल्ह्यात होत आहे. या निवडणुकीतही भाजपकडून अनपेक्षित खेळी होण्याची शक्‍यता आहे
BJP in Vidarbha Making Action Plan in Council Election
BJP in Vidarbha Making Action Plan in Council Election

यवतमाळ  : राज्यातील सत्तापालटानंतर जिल्ह्याचे मिनिमंत्रालय तसेच विधान परिषदेची जागा आपल्याकडे राहावी, यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी युद्धात उतरलेल्या भाजपची तलवार म्यान झालेली नाही. महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का देण्याची तयारी भाजपची आहे. यासाठी रणनीती ठरली असून शनिवारी भाजप आमदार तसेच जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत याला अंतिम रूप आल्याची माहिती आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत राज्याच्या राजकारणात भाजपला धक्का दिला. हाच प्रयोग आता जिल्ह्याजिल्ह्यात सुरू आहे. नगरपालिका, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचे मनसुबे आहेत. तसा प्रयोग केल्या जात आहे. पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा प्रत्यय आला. मंत्रालय भाजपच्या हातून गेले असले तरी जिल्ह्याचे मिनिमंत्रालय पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. 

यासाठी 'अॅक्‍शन प्लॅन' भाजपने तयार केल्याची माहिती आहे. मिनिमंत्रालयासोबतच विधान परिषद पोटनिवडणूक जिल्ह्यात होत आहे. या निवडणुकीतही भाजपकडून अनपेक्षित खेळी होण्याची शक्‍यता आहे. तशी तयारी भाजपतर्फे सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता काबीज करणे सुरू असले तरी जिल्ह्यात याला 'ब्रेक' लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. काही बाबीवर स्पष्टता व्हावी, यासाठी शनिवारी (ता. ११) जिल्ह्यातील भाजपचे आमदार तसेच जिल्हाध्यक्षांची अत्यंत महत्त्वाची बैठक शहराबाहेर झाली. 

या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणूक तसेच विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. भाजपने जी रणनीती आखली आहे, त्यावर चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. बैठकी संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा तसेच आमदारांशी संपर्क साधला असता कुणीही बोलण्यास तयार नाही. अनौपचारिक चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी 'आगे आगे देखो होता है क्‍या' एवढेच उत्तर अनेकांकडून ऐकायला मिळाले. यामुळे भाजप जिल्ह्यात उलटफेर करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

दोन दिवसांत सर्व कळेल

जिल्हा परिषद, विधान परिषद पोटनिवडणूक तसेच बैठकीसंदर्भात भाजप आमदारांशी संपर्क साधला असता अनेकांनी दोन दिवस थांबा सर्व चित्र स्पष्ट होईल. काय ते समोर येईलच, अशी प्रतिक्रिया देत अनपेक्षित घडामोडी घडतील असे संकेत दिले. यामुळे जिल्हा परिषदमध्ये भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार का? असा प्रश्‍नही चर्चेला जात आहे.

महाविकास आघाडीची आर्णीत बैठक

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तिन्ही पक्षांतील नेत्यांची एकत्रित बैठक शनिवारी (ता.11) आर्णी येथे सायंकाळी झाली. बैठकीतील तपशील बाहेर आला नसला तरी पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते एकत्र वावरताना दिसल्याने अनेकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com