आमदार मुरकुटे हे तर विखेंच्या पायातील घुंगरू!

मोदी-फडणवीस यांच्या विरोधात ही लढाई असल्याचे समजून, प्रत्येकाने आजपासूनच कामाला लागावे.
आमदार मुरकुटे हे तर विखेंच्या पायातील घुंगरू!

सोनई (नगर) : "मनोधैर्य खचलेले नेते भाजप-शिवसेनेच्या कळपात सामील होत आहेत. या कुबड्या झुगारून व पक्षाची लाचारी नको म्हणून विधानसभा निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे,'' अशी घोषणा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आज केली.

सोनई येथे 'क्रांतिकारी'च्या तालुका संकल्प मेळाव्यात गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. बाजार समितीचे अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, भैयासाहेब देशमुख, भाऊसाहेब लांडे, नानासाहेब रेपाळे, शिवाजी दरंदले, सुरेश बानकर उपस्थित होते.

शंकरराव गडाख म्हणाले, "मोदी-फडणवीस यांच्या विरोधात ही लढाई असल्याचे समजून, प्रत्येकाने आजपासूनच कामाला लागावे. हा खूप मोठा जुगार असला, तरी जलसंधारण, वीज व रोजगारासाठी केलेल्या कामामुळे आपलीच विजयी पताका फडकेल. विकासदिंडीचा देखावा नौटंकी असून, खोट्या आकडेवारीचा हा फुगा फुटणार आहे.''

"शासकीय निधीची टिमकी वाजविणाऱ्या आमदार मुरकुटे यांनी मागील पाच वर्षांत काय दिवे लावले? सोनईत कीर्ती बंग यांनी शाळा काढून शंभर जणांचे संसार उभे केले. त्यांचा आदर्श घ्यावा,'' असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

राजकारणात मागील 50 वर्षांतील कामांचा पाढा वाचून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी, नगरच्या खासदाराच्या पायातील घुंगरू, असा आमदार मुरकुटे यांचा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. आताच्या सरकारने मुळा धरणाची अवस्था द्रौपदीप्रमाणे केल्याचे सांगून ते म्हणाले, की पाटपाणी, धरणाची उंची, रोजगार आणि घाटमाथ्याचे पाणी धरण प्रवाहात आणण्यासाठी शंकररावच आमदार असणे गरजेचे आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com