उदगीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना राबवली. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादीचेही अस्तित्व संपवणार असे भाकित कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केले. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भानगडीत न पडता विकासासाठी भाजपच्या डॉ. अनिल कांबळे यांना विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी उदगीर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.
गुरुवारी (ता.17) येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार अनिल काबंळे यांच्या प्रचारासाठी येडियुरप्पा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण, बिदरचे खासदार भगवंत खुबा, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे आदींची उपस्थिती होती. यावेळी येदियुरप्पा यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, केंद्रात दहा वर्षे व राज्यात पंधरा वर्षे सत्ता असूनही कॉंग्रेस आघाडीने विकास कामे केली नाहीत. गेल्या पाच वर्षात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विकास काय असतो हे राज्यातील जनतेला दाखवून दिले आहे. भाजप सरकारने नदी जोडण्याचा निर्णय घेतला. नदीजोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांनी एका देशात दोन विधान आणि दोन निशान चालणार नाही असे ठणकावून सांगितले होते, याची आठवण करून देत येडियुरप्पांनी कलम 370 च्या विषयाला हात घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कठोर भूमिका घेत जम्मू कश्मीर मधील कलम 370 रद्द करून अखंड भारत निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे तमाम देशवासीयांनी स्वागत केले. या निर्णयामुळे आता काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य करण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगतानाच डॉ. अनिल कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन येडियुरप्पा यांनी शेवटी केले. पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. देवेंद्र फडवणीस सरकारच्या काळात राज्यात सात लाख बेघरांना घरे मिळाली, आणखी तीन लाख बेघरांना घरे देण्यात येणार आहेत.
राज्यात सहा हजार किलोमीटर अंतराचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर असून दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय गोरगरिबांसाठी महत्वाचा ठरल्याचे महायुतीचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

