शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा लेखक काय करतात ?

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर अनेक लेखकांनी त्याचा निषेध करत संमेलनावर बहिष्कर घातला आहे,त्यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली.
Raju Shetty
Raju Shetty

पुणे :" जेंव्हा  शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा लेखक काय करतात ? रस्त्यावर उतरतात  का ?नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून जे निषेधाचे आवाज उमटत आहेत ते आवाज आमचा शेतकरी गळफास लावून मरतो,धर्मा पाटील मंत्रालयाच्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करतो,एसटीच्या पासला पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्याची मुलगी आत्महत्या करते तेव्हा  कुठे गेलेले असतात ?"असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. 

शेट्टी म्हणाले," जे न देखे रवी ते देखे कवी असं लहानपणापासून शिकत आलोय ,पण शेतकरी चळवळीत आल्यावर मात्र लेखक  कवींच्याकडून भ्रमनिरास झाला. काही मोजके अपवाद वगळता कवी आणि लेखक कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने येत नाही किंवा त्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत  त्यामुळे  आमच्या  व्यथा आणि वेदनाबद्दल हे लेखक संवेदनशील नाहीत असं वाटत. आता जेवढा निषेध केला जातो तेवढा निषेध सरकारी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा का केला जात नाही. तेव्हा हे आवाज कोठे जातात?राबणाऱ्या माणसाच्या बाजूने हे लेखक का उभे राहत नाहीत."

"शेतकऱ्यांची दुःख  मराठी साहित्यात मांडणारे विठ्ठल वाघ आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत अशी भूमिका एकदा मी मांडली होती तेव्हा मला लेखकांनी 'साहित्य संमेलन म्हणजे काही उसाचा फड नाही. 'असं हिणवलं होतं. म्हणजे या लोकांना शेतकऱ्यांचा विचार करणारा अध्यक्ष नको आहे. मराठी लेखक कष्ट करणाऱ्या लोकांची बाजू कधी घेणार आहेत ?आता जसे एकवटत आहेत,बहिष्कर घालत आहेत तशी भूमिका शेतीप्रश्नावर  घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्यासाठी असा आवाज कधी उठवला आहे का ?असा प्रश्न  शेट्टी यांनी उपस्थित केला . 

राजू शेट्टी पुढे म्हणाले ,"यवतमाळ जिल्हात हे संमेलन होत आहे तिथं राज्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या संमेलनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून काही विचारविनिमय आणि  चर्चा होणार आहे का ?शेतकऱ्यांना आधार वाटेल असं सकारात्मक काही होणार आहे का ?हे मला पडलेले प्रश्न आहेत . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com