working freely in BJP : Narendra Patil | Sarkarnama

`राष्ट्रवादी'ने मला बांधून ठेवले : नरेंद्र पाटील 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. उलट भाजपने मला या महामंडळाच्या माध्यमातून मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली आहे. आता राज्याच्या प्रमुखांना वाटले तर मी लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. 

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. उलट भाजपने मला या महामंडळाच्या माध्यमातून मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली आहे. आता राज्याच्या प्रमुखांना वाटले तर मी लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नरेंद्र पाटील आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

तुम्हाला राष्ट्रवादीत बरे होते की भाजपमध्ये बरे वाटते, या प्रश्‍नावर नरेंद्र पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत मला केवळ एका ठिकाणी बांधून ठेवले होते. आज भाजपमुळे मला मोकळ्या अर्थाने काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही पण पाटणला जायचो त्यावेळी ढेबेवाडीत जाऊन बसायचो आणि विकास निधी देत. या पलिकडे मेळाव्याला बोलावले तरच जात होतो. अजित पवार यांचा आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी कोणी कोणी मदत केली होती, हे सर्वांना माहित आहे. यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी मला फ्री हॅण्डने काम करण्याची संधी दिली आहे. तसेच वडिलांच्या नावाने असलेल्या महामंडळावर काम करण्याची संधी दिली. सामान्य लोकांशी बोलून त्यांना न्याय मिळावी. भाजपने मला काम करण्याची मला संधी दिली त्यातून चांगले काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

पाटण विधानसभा की सातारा लोकसभा लढण्याची इच्छा आहे, या प्रश्‍नावर नरेंद्र पाटील म्हणाले, निवडणुकीबाबत मी काहीही ठरविलेले नाही. महामंडळाचे काम चांगल्याप्रकारे करण्यावर माझा भर राहणार आहे. मी माथाडी चळवळीतील माणूस आहे. विधानपरिषद मिळाली तेव्हा मी येथे येत होतो आणि काय काय भाषण करत होतो हे तुम्हाला माहित आहे. जिल्ह्यात काय काय होतेय हे तुम्हाला माहित आहे. मी अजूनही काहीही मागणी केलेली नाही. राज्याच्या प्रमुखांना वाटलेच की नरेंद्र आता निवडणुक लढविली पाहिजे. तर मी तयार असेन. त्यांनी खासदारकी लढा असे सांगितल्यास मी तयार आहे. त्यांना वाटले की महामंडळाच्या माध्यमातून तळागाळात जाऊन काम करा, मी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्या प्रायोरिटी महामंडळ आणि मराठा समाज ही आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोणत्याही समाजातील स्त्रीयांविषयी अपशब्द वापरू नये, असे स्पष्ट करून नरेंद्र पाटील म्हणाले, लक्ष्मण माने हे आमदार होते, ज्यावेळी आपण आमदार होतो. त्यावेळी सर्वधर्म समभाव पाळणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. मराठा समाजाने जे निवेदन दिले आहे ते राज्य शासनाकडे पाठविले आहे. मीही मुख्यमंत्र्यांना भेटून मानेंवर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला दिलेले आरक्षण ही या समाजाची फसवणूक असून हे न्यायालयात टिकाणार नाही, असे मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले होते. यावर नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत श्रीमंत कोकाटे यांचे ते वैयक्तिक मत आहे. त्यांचा याबाबतचा अभ्यास चांगला असेल. पण सरकारनेही तज्ञांचा सल्ला घेऊच निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चुकीचे करणार नाहीत आणि समाजाला न्याय देतील. याची मला गॅरंटी आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख