workes not happy for decline in INTUC organisation | Sarkarnama

इंटकच्या अधोगतीविषयी कामगार क्षेत्रात नाराजीचा सूर

संदीप खांडगेपाटील
सोमवार, 1 मे 2017

एकेकाळी देशातील क्रंमाक एकची कामगार चळवळ राबविणारी संघटना असा या इंटकचा  नावलौकीक होता,पण आता हा नावलौकीक इतिहासजमा झाला असून इंटकलाच अस्तित्वाला घरघर लागलेली पहावयास मिळत आहे.

मुंबई : एकेकाळी कामगार क्षेत्रात व औद्योगिक विश्‍वात दबदबा असणार्‍या राष्ट्रीय मजदूर काँग्रेस म्हणजेच इंटकची काँग्रेसपाठोपाठ अधोगती सुरू झाली आहे. सद्य:स्थितीत इंटकचा दबदबा नामशेष होण्याच्या मार्गावर असून इंटकच्या अधोगतीविषयी कामगार क्षेत्रात नाराजीचा सूर आळविला जात आहे.

काँग्रेस पक्षात कार्यरत असणार्‍या पदाधिकार्‍यांना व लोकप्रतिनिधींना इंटकचे पदाधिकारी असणे एकेकाळी मान-सन्मानाची व प्रतिष्ठेची गोष्ट वाटायची. पण आता कामगार क्षेत्रात इंटकच अस्तित्वासाठी संघर्ष करू लागल्याने इंटकचे पद घेणे म्हणजे पक्षीय प्रवाहातून अडगळीत टाकल्यासारखे असल्याची भावना काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून व लोकप्रतिनिधींकडून उघडपणे व्यक्त करण्यात येवू लागली आहे.

बुधवारी, 3 मे रोजी इंटकचा गौरवशाली वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा केला जात असताना काँग्रेसच्या वर्तुळात इंटकच्या वर्धापनदिनाविषयी फारसा उत्साह पहावयास मिळत नाही. मुंबईतील काळा घोडा येथील  महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्समधील डहाणूकर सभागृहात  दुपारी 2 वाजता या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एकेकाळी देशातील क्रंमाक एकची कामगार चळवळ राबविणारी संघटना असा या इंटकचा  नावलौकीक होता,पण आता हा नावलौकीक इतिहासजमा झाला असून इंटकलाच अस्तित्वाला घरघर लागलेली पहावयास मिळत आहे. इंटकचा कार्यभार सध्या राष्ट्रीय अध्यक्ष संजीवा रेड्डी हे सांभाळत असून जयप्रकाश छाजेड हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक महापालिका कार्यक्षेत्रात स्थानिक कामगार संघटना प्रभावी ठरू लागल्याने व स्थानिक कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांचे निवारण होवू लागल्याने कामगारांनाही इंटकचे आकर्षण हल्लीच्या काळात फ ारसे वाटत नाही.

शरद रावांची कामगार संघटना शहरी भागात आक्रमकपणे वाटचाल करत आहे, शिवसेनेच्या कामगार संघटनेचाही शहरी भागात चांगला प्रभाव आहे. ग्रामीण भागात स्थानिक कामगार संघटनेचा प्रभाव आहे. त्यातच ठिकठिकाणी कामगार नेतेही उदंड होवू लागल्याने स्वतंत्र कामगार संघटना स्थापन करून त्यांनी आपले स्थानिक पातळीवर स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.

इंटकच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला अनेक प्रभावशाली नेते मिळाले व काँग्रेस पक्षामध्ये कामगार नेते नावारूपाला आले. सध्या उरण-पनवेल भागात महेंद्र घरत आणि नवी मुंबई परिसरात रवींद्र सावंत यांचा अपवाद वगळता राज्य स्तरावर कोणी फारसे प्रभावीपणे  काम  करत असल्याचे दिसून येत नाही. 70 वा वर्धापन दिन साजरा करत असलेल्या इंटकचा शहरी भागात, ग्रामीण  भागात,  औद्योगिक परिसरात, कारखाने-कंपन्यांमध्ये कमी होत चाललेला प्रभाव नजीकच्या भविष्यात इंटकचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच राहण्याची भीती काँग्रेसच्या घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख