workers walks 120 km to reach home from nagpur | Sarkarnama

ये कौनसी बिमारी है साहाब, आदमी आदमी से दूर है!

अशोक डाहाके
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना या ससंर्गजन्य आजाराने सर्वत्र शिरकाव केल्याने माणूसच माणसाचा वैरी झाल्याचे पहावयास मिळत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणीही कुणाची मदत करायला तयार नाही. लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील कामगारांना नागपूर येथून छिंदवाडा हा 120 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे.

केळवद (जि. नागपूर) ः कोरोना या ससंर्गजन्य आजाराने सर्वत्र शिरकाव केल्याने माणूसच माणसाचा वैरी झाल्याचे पहावयास मिळत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणीही कुणाची मदत करायला तयार नाही. लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील कामगारांना नागपूर येथून छिंदवाडा हा 120 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे. या स्थितीत या कामगारांना मदतीचा हात द्यायला, कोणी समोर येत नसल्याने कोरोनाच्या दहशतीत माणुसकी लुप्त झाल्याचा प्रत्यय येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना याचा जबर फटका बसला आहे.

विशेषत: मध्य प्रदेशातील लगतच्या छिंदवाडा जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात कामावरती आहेत. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यवसायाशी जुळलेल्या सर्वच कामात हे मजूर काम करण्यासाठी शहरात दाखल झाले होते. मात्र, कोरोनासारख्या भयानक आजाराने सर्वत्र हाहाकार उडाला. या मजुरांना आज कामावरचे ठेकेदारसुद्धा बेवारस सोडून पळून गेल्याने कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायी जावे लागत आहे. यात बहुतांश तरुण असले तरी वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय असल्याने हे कामगार नागपूर येथून थेट छिंदवाड्याला पायी निघाले.

वाटेत न मिळणारे जेवण तसेच रस्त्याने जाणारे कोणतेही साधन यांना बसवायला तयार नसल्याने नाइलाजाने त्यांना पायदळ चालावे लागत आहे. वाटेत कुठे एखादे दुकान ऊघडे दिसले, तेथे बिस्कीट अथवा वेपर्स पाकीटवर ते भूक भागवत आहेत. या भयानक स्थितीत कोणीही यांच्या मदतीला येत नाही. काल रात्री दहाच्या सुमारास (कापशी) नागपूर येथून पायी आलेले वीस ते पंचवीस मजूर केळवदच्या बसस्थानकावर विसावा घेत होते. आज सकाळपासून मजुरांचे जथ्थे पायी केळवद येथून छिंदवाड्याच्या दिशेने जाताना दिसत होते. अशात नागपूर येथून पायी आलेल्या मजुरांनी तर "साहब यह कौनसी बिमारी है, जो जिंदा आदमी को जिंदा आदमी से दूर ले जा रही है. ऐसी बिमारी कभी धरतीपे न आये, असे खिन्न अवस्थेत सांगत पुढील प्रवासाची वाट धरली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख