Women should enter the politics thoght there are challeges | Sarkarnama

आव्हान असेल तरी राजकारणात या : प्रा. वर्षा गायकवाड, आमदार काँग्रेस

शब्दांकन- उर्मिला देठे, मुंबई
सोमवार, 20 मार्च 2017

नेता म्हटले की रात्री-अपरात्री दारावर थाप पडणार, मदतीची हाक येणार. शिवाय सासरच्या घरी राजकारण नसेल तर त्या लोकांना विश्‍वासात घेऊन पुढची पावले टाकावी लागतात. महिलेला हे हाताळणे कठीण असले तरी अशक्‍य नाही. माझ्या घरी वडिलांनी दिलेला पाठिंबा आणि आता पतीची साथ यामुळे एकेक पाऊल उचलत आहे.

पहिलं पाऊल

राजकारणात टिकून राहणे कठीण आहे. तिथे महिलांसाठी हे आव्हान जरा अधिकच. पण तरीही महिलांनी राजकारण उतरले पाहिजे असे मला वाटते. महिला राजकारणात असल्याने बरेच बदल घडू शकतात. सर्वांत महत्त्वाचा बदल होतो म्हणजे एखादी महिला लोकप्रतिनिधी समाजात वावरू लागली की आडोशाला उभ्या राहणाऱ्या महिलाही बोलत्या होतात. आपले म्हणणे जरासे बुजत का होईना, पण ठामपणे मांडतात. त्यामुळे समाजाच्या शेवटच्या उतरंडीवर असलेल्या महिलेच्या समस्या खऱ्या अर्थाने समजतात.

मीमुळची मुंबईची. धारावीत वाढलेली. त्यामुळे अख्ख्या धारावीशी माझा लहानपणापासून परिचय. आमदार झाले तेव्हा प्रत्येकाला तो स्वतःचा विजय वाटला. लोकप्रतिनिधी या नात्याने काम सुरु झाले. राजकीय नेत्याला कैफियती सांगायला पुरुष पुढे यायचे, चार-दोन महिन्यांतच वस्तीतल्या बायका मला पाहून पुढे येऊ लागल्या. महिलांची वृत्ती सर्व बाजूंनी विचार करण्याची. त्यांच्या सहभागामुळे मलाही अनेक मौलिक गोष्टी समजायला लागल्या. एखाद्याच्या घरी समारंभाला गेले की महिला चटकन त्या भागाची खरी गरज लक्षात आणून देतात, हा माझा अनुभव आहे.

माझ्या वडिलांमुळे मी राजकारण जवळून पाहित होते. हे बदलाचं फार मोठे माध्यम आहे याबाबत मला खात्री होती. वडिलांनी, एकनाथ गायकवाडांनी माझ्या भावाऐवजी मला राजकारणात यायला प्रोत्साहन दिले, कारण त्यांना माझी बांधिलकी कळत होती. ते राजकारणात असल्याचा फायदा जरूर झाला, पण मोठ्या वृक्षाखालच्या छोट्या झाडावर लक्ष जायला वेळ लागत असल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख तयार करण्यासाठी मला भरपूर मेहनत घ्यावी लागली.

इंदिरा गांधी कित्येक वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधान झाल्या. त्या काळचे वातावरण तर खूपच प्रतिकूल होते. आता समाज बऱ्याच प्रमाणात बदललाय. प्रागतिक विचारसरणीच्या अनेक खुणा दिसताहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सक्रिय झाल्या, आरक्षणामुळे महिला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्याने एकूणच राजकारणाचा पुरुषी तोंडवळा बदलत होताच. त्यामुळे आम्हा राजकारणातील महिलांना तितकासा संघर्ष करावा लागला नाही. आज राजकारणाभोवती निर्माण झालेले वलय सिनेमासारखेच आहे. त्यातले ग्लॅमर दिसते पण त्यामागची प्रचंड मेहनत जनतेला कळत नाही.

नेता म्हटले की रात्री-अपरात्री दारावर थाप पडणार, मदतीची हाक येणार. शिवाय सासरच्या घरी राजकारण नसेल तर त्या लोकांना विश्‍वासात घेऊन पुढची पावले टाकावी लागतात. महिलेला हे हाताळणे कठीण असले तरी अशक्‍य नाही. माझ्या घरी वडिलांनी दिलेला पाठिंबा आणि आता पतीची साथ यामुळे एकेक पाऊल उचलत आहे.

धारावी सारख्या प्रभागातून जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. त्याच्या आधी विक्रोळीतील निर्मल महिला मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आणि रयत महासंघ व अभय शिक्षण केंद्र या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सुरु केले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सदस्या झाले 2004 ते 09 आणि 2009-14 या काळात विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. 2008-09 मध्ये महिला हक्क व कल्याण समितीची प्रमुखही बनले. विधानमंडळातील उल्लेखनीय कामासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा 2006-07 साठीचा महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही प्राप्त झाला.

वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, पर्यटन खात्याचे राज्यमंत्री व 2014 मध्ये महिला व बालविकास खात्याचे मंत्री झाले. 2014 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये मी विधानमंडळात पहिले पाऊल टाकले. विधानसभा कामकाजाच्या व नियमाचा सखोल अभ्यास करून मतदारसंघातील व राज्यातील सर्वसामान्याच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी व लोकोपयोगी कामे मार्गी लागण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर केला. यावेळी संसदीय आयुधांना विधीमंडळ कामकाजात व पर्यायाने लोकशाहीत असलेले पुनर्विकासाच्या प्रश्‍नाबरोबर महिला, मागासवर्गीयांचे प्रश्‍न व मुंबई शहराच्या समस्या तसेच समाजातील शोषित व वंचित घटकांबद्दल प्रश्‍न मांडून ते तडीस नेण्यासाठी केलेला पाठपुरावा मला नेहमी स्मरणात राहील.

 

महिला व बालविकास विभागाचे संबंधित अधिकारी तसेच राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी बैठका घेऊन महिलांना न्याय देण्याबाबतच्या शिफारशी समितीच्या माध्यमातून सभागृहाला केल्या. समिती प्रमुखपदी असतांना निरनिराळी बालसुधार गृहे, भिक्षेकरी गृहे तसेच मुलींच्या वसतिगृहांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात तसेच तेथील मुली व बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासंदर्भात अनेक विधायक शिफारशी विधान मंडळास केल्या. देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतीपदावर प्रतिभाताई पाटील यांची निवड होण्याच्या बाबीबद्दल विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडला होता. विधानसभेची सदस्या म्हणून मला हे शक्‍य झाले. त्याच प्रतिभाताई यांच्या हस्ते मला 2006-07 चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान झाला.

बाराव्या विधानसभेत जेव्हा माझी फेरनिवड झाली तेव्हा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याक्षणी राज्याच्या विकासात आपले योगदान नोंदवायला पाहिजे याची जाणीव प्रकर्षाने जाणविली. महिला व बालकल्याण मंत्री म्हणून नेमणूक झाल्याने, महिलांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दर्जा उन्नत योजना मार्गी लावल्या. महिला सबलीकरणाच्या अजूनही काही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

सभागृहात दिलेल्या निरनिराळ्या आश्‍वासनांना राज्यस्तरीय धोरणात्मक निर्णयाप्रत नेण्यासाठी त्या त्या विषयांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याची जाणीव त्यावेळी झाली. अमोघ वकृत्व , अजोड नेतृत्व व अचाट कतृत्व असणाऱ्या दिग्गजांची विधान मंडळाला परंपरा आली त्यामुळे अशा परंपरेत सामिल होण्याची संधी जबाबदारीने पेलणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख