Women dignity will take the Nation Forward | Sarkarnama

‘स्त्री प्रतिष्ठा’च देश, समाजाच्या प्रगतीचा पाया अभिजित पवार यांचे पहिल्या तनिष्का संमेलनात प्रतिपादन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

समाजाची व राष्ट्राची सक्षम उभारणी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती आवश्‍यक आहे. कुटुंबातली महिला ही या प्रगतीचे शक्‍तिस्थान आहे. त्यामुळे, प्रत्येक महिलेला सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यास बलवान राष्ट्राची निर्मिती ​सहजच ​शक्‍य आहे- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक सकाळ माध्यम समुह

मुंबई : देश व समाजाला प्रगतिपथावर न्यायचे असेल तर स्त्री प्रतिष्ठा हाच ​त्याचा पाया आहे. ​कारण, ​समाजाच्या प्रगती​ची​ ​कर्ती ही स्त्रीच आहे. ​ हे शक्य व्हावे यासाठीच सकाळ माध्यम समूहाने चार वर्षांपूर्वी महिलांच्या नेतृत्व विकासाचा सर्वंकष विकास साधणारे तनिष्का हे व्यासपीठ निर्माण केले​. प्रगत व आधुनिक राष्ट्राच्या निर्मिती​त या तनिष्का व्यासपीठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ​ठरणार असल्याचे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी बुधवारी (ता. १९) येथे केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये बुधवारी राज्यभरातून निवडणुकीच्या माध्यमातून विजयी झालेल्या तनिष्कांचे ​पहिले ​दोन दिव​सीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलना​चे मान्यवरांच्या हस्ते ​दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन​ करण्यात आले. या​ सोहळ्यानंतर अभिजित पवार ​यांनी तनिष्कांशी मुक्त संवाद साधला. या वेळी व्यासपिठावर सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, ​‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी, ​राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, एलिफंट डिझाईनच्या चेअरमन अश्‍विनी देशपांडे उपस्थित होत्या.

अभिजित पवार म्हणाले​,​ की समाजाची व राष्ट्राची सक्षम उभारणी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती आवश्‍यक आहे. कुटुंबातली महिला ही या प्रगतीचे शक्‍तिस्थान आहे. त्यामुळे, प्रत्येक महिलेला सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यास बलवान राष्ट्राची निर्मिती ​सहजच ​शक्‍य आहे. देश​, राज्य ​वा समाजाचा मुख्य घटक असतो ​कुटुंब​. घरातली स्त्री सक्षम असते​ ते कुटुंब सुखी असते​. ​म्हणजेच, सक्षम महिला हीच आधुनिक व प्रगतशील कुटुंबा​चा​​ ​आधार असल्याने समाजाची अर्धी लोकसंख्या असलेल्या या महिला वर्गाला प्रतिष्ठा मिळवून देणे हे सकाळ माध्यम समूह व तनिष्का व्यासपीठाचे ध्येय असल्याचे अभिजित पवार यांनी स्पष्ट केले. प्रत्येक स्त्रीला ​तिच्या ​शक्तीची जाणीव करून दिली व सामाजिक प्रगतीत ​त्यांचा सहभाग घेतला तर दे​शाची प्रगती वेगाने होऊ शकते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

लोकशाही राष्ट्राला शाश्‍वत यश मिळवायचे असेल तर लोकसहभाग गरजेचा आहे. त्यात​ही​ महिलांचा लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठीच तनिष्काचे व्यासपीठ काम करत आहे. चार वर्षांत या तनिष्कांनी राज्यभरात अनेक यशस्वी कार्यक्रम राबवून देशाला भूषण वाटेल अशा यशोगाथा तयार केल्या​चा उल्लेखही त्यांनी केला.

समाजातल्या सर्वसामा​न्यांचा आवाज असलेल्या सकाळ​ने, समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून ​तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून ​ स्त्री प्रतिष्ठा व महिला नेतृत्व विकास कार्यक्रम राबवला जात आहे. ​तनिष्कांना जगातले​ सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे, हा आमचा प्रयत्न असून त्यामधून​च​ महिलांचा कौशल्य व क्षमताविका​साला योग्य दिशा मिळू शकेल, असे ते म्हणाले. हे व्यासपीठ सर्व महिलांसाठी खुले असून ​उज्वल ​भविष्या​साठी आपण सर्वजण मिळून ​प्रयत्नशील राहू, असे आवाहनही अभिजित पवार यांनी या वेळी केले.

राजकारणावर सतत ​टीका व भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची ​आपली ​मानसिकता ​असते. त्याला पर्याय म्हणून तनिष्का हे उत्तम व्यासपीठ आहे. संपूर्णत: अराजकीय असलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रत्येक महिला समाज व राष्ट्राच्या उभारणीत योगदान देवू शकते. केवळ आपण अडचणीत असताना समाजाची मदत मागण्यापेक्षा आपण समाजासाठी काय करतो हे आत्मभान बाळगून कार्य करणाऱ्या महिलांसाठी तनिष्ठा हे व्यासपीठ असल्याचे पवार म्हणाले.

विदेशातही ‘तनिष्का’
महाराष्ट्रात सुरू झालेल्या तनिष्कांची गरज विदेशातल्या महिलांनाही असल्याचे अभिजित पवार यांनी सांगितले. जगभरातल्या अनेक देशां​तील महिलांनी त्यांच्या देशात तनिष्का व्यासपीठ स्थापन करण्याची मागणी केली ​आहे. जर्मनीत तनिष्का सुरू करण्याचा आग्रह ​होतो आहेच, पण अमेरिके​तील​ महिलां​नाही या व्यासपीठाची आवश्यकता भासते आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातून सुरू झालेली ही महिला प्रतिष्ठेची चळवळ देशांच्या ​सीमाही ओलांडेल, असा विश्‍वास अभिजित पवार यांनी व्यक्‍त केला. उपस्थित तनिष्कांनी टाळ्यांच्या गजरात ​या विश्वासाला पाठबळ दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख