"रेड लाईट' विभागातील महिलांची परवड #corona effect

खालच्या वर्गातील स्त्रियांना कोरोनामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
red light area facing problem due to corona
red light area facing problem due to corona

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य सेवाही खंडित झाल्याने भिवंडीच्या "रेड लाईट' विभागातील आजारी महिलांची परवड होत आहे. टीबी, एचआयव्हीबाधित महिलांच्या हालअपेष्टांमध्ये लॉकडाऊनने अधिक भर पडली आहे.

देशभरातील लॉकडाऊनमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. भिवंडीतील हनुमान टेकडीवरील "रेड लाईट' परिसरातील महिलांची कुचंबणा होत आहे. या परिसरात साडेपाचशेहून अधिक लोकसंख्या आहे. त्यातील अनेक महिला टीबी, एचआयव्ही अशा आजारांनी ग्रस्त आहेत. या महिलांना वेळेवर औषधे मिळणे आवश्‍यक असते; परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

हनुमान टेकडी परिसरात 300 पेक्षा अधिक घरे आहेत. तेथील आजारी महिलांसाठी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही. सरकारी किंवा खासगी दवाखाने दूर असल्याने या महिलांना तिथे जाता येत नाही. शिवाय त्यांना स्थानिकांच्या विरोधाचाही सामना करावा लागतो. सामाजिक संस्थांच्या मदतीने तिथे दिल्या जाणाऱ्या काही सोईसुविधाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या महिलांवरील संकटांत आणखी वाढ झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
कोरोना संसर्गापासून संरक्षणासाठी या परिसरातील महिलांना मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे जनजागृती करण्याचीही आवश्‍यकता होती; परंतु या भागात एकही सरकारी अधिकारी फिरकलेला नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, सर्वत्र कचरा साचला आहे. त्यामुळे दुर्गंधीसह रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रेड लाईट परिसरातील महिलांना टीबी, एचआयव्हीसारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. परिसराबाहेर जाऊन किंवा खासगी दवाखान्यांत उपचार घेणे त्यांना परवडत नाही. म्हणून सरकारने येथे कायमस्वरूपी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे.
- मन्सूर पटेल, सामाजिक कार्यकर्ते, खुशी सोशल ऍण्ड कल्चरल असोसिएशन

रेड लाईट परिसरात सामाजिक संस्था आणि त्यांच्या स्वयंसेवकांच्या मदतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जमावबंदीच्या आदेशामुळे अडचणी येत आहेत; मात्र आमचे स्वयंसेवक तेथील रहिवाशांपर्यंत आरोग्यसेवा आणि प्रतिबंधात्मक उपकरणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
- डॉ. श्रीकला आचार्य, प्रकल्प संचालक, एड्‌स नियंत्रण सोसायटी
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com