Woman MLAs denounce rape in Nagpur MLA hostel | Sarkarnama

आमदार निवास बलात्कार प्रकरणी महिला आमदारांचा निषेध

सुचिता रहाटे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

महिला कुठेच सुरक्षित नाहीत. आमदार निवासस्थानी घडलेली हि घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. पुरुषांची मानसिकता जोवर बदलत नाही तोवर हे नियम आणि कायदा फक्त कागदोपत्रीच राहणार.

-प्रणिती शिंदे : आमदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मुंबई : नागपूर येथील आमदार निवासस्थानी एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. हि मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात करत असून तिच्या सहकाऱ्यांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आलेले आहे.

आमदार निवासाच्या ३२० नंबरच्या खोलीमध्ये गेल्या ३ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची खळबळ जनक बाब समोर आली आहे. भोपाळला फिरायला जायचे सांगून आपल्यासोबत येण्यासाठी राजी करत रजत भद्रे व मनोज भगत यांनी तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. आमदार निवासाच्या एकूणच गलिच्छ कारभारभारचा मुद्दा पुन्हा उपस्थित होतो. यावर काही महिला आमदारांनी सरकारनामा ला प्रतिक्रिया दिल्या.

१) "हा विषय गृहविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करू शकत नाही."
पंकजा मुंडे- ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री. भारतीय जनता पक्ष

२) "आमदार निवासस्थानी बलात्कार होणे म्हणजे, समांजकंटकांचा धुडघुस वाढला आहे."
नीलम गोर्हे : आमदार शिवसेना

कुठलीही बलात्काराची घटना ही निंदनीय व गंभीर आहे. हा घटनेनंतर समाजकंटकांची मजल कुठवर पोहचली हे दिसून येते. विधिमंडळच्या कामकाजाकरता येणाऱ्या आमदारांचे ते निवासस्थान आहे. यावरून समाजकंटक याचा कसे गैरवापर करतात ही बाब समोर आली आहे. या घटनेची चौकशी करुन आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

३) पुरुषांचा महिलांकडे पाहण्याचा मानसिक दृष्टीकोन बदलायला हवा.
प्रणिती शिंदे : आमदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

महिला कुठेच सुरक्षित नाहीत. आमदार निवासस्थानी घडलेली हि घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. पुरुषांची मानसिकता जोवर बदलत नाही तोवर हे नियम आणि कायदा फक्त कागदोपत्रीच राहणार.

४) "समाजाचा समतोल बिघडला आहे."
वर्षा गायकवाड: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमदार

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. पोलीस आणि कायदा करून उपयोग नाही. याचे मूळ कारण समाजाचा समतोल बिघडत चालला आहे त्याकडे आपण जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

५) "सत्ताधारी पक्षाचा भोंगळ कारभार."
विद्या चव्हाण: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

हे सगळे चीड आणणारे आहे. हे असे सगळे प्रकार आमदार निवासस्थानी या अगोदरही चालत असतील याची कसून चौकशी झालीच पाहिजे. सरकारच्या कायदा आणि सुव्यस्थेचे धज्जे उडाले आहेत. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे कायदासुव्यवस्था असूनही हे प्रकार घडत आहेत हे खूपच लज्जास्पद आहे. अशाप्रकारच्या घटना नागपूरमध्ये वाढतच आहेत.

६) "महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरील कायदे अजून कठोर व्हायला हवेत."
भरती लव्हेकर : आमदार, भारतीय जनता पक्ष

आमदार निवासस्थानी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करते. महिलांवर वाढत्या अत्याचारावर कायदे अजून कडक होण्याची गरज आहे नाहीतर अश्याप्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख