woman candidate promise to provide liquor for poor in concessional rate | Sarkarnama

गाव तिथे बिअर बार आणि गरिबांना सवलतीत दारूची बहार : महिला उमेदवाराचे असेही आश्वासन

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

या उमेदवाराचा हा जाहीरनामा पाहून तुम्हीही चक्रावून जाल....

चंद्रपूर : निवडणुकीत कोणता उमेदवार काय आश्‍वासन देईल, याचा नेम नाही. चिमूर विधानसभा मतदारसंघात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने मतदारांना आगळे-वेगळे आश्‍वासन दिले आहे. तिने दारिद्रय रेषेखालील जनतेला सवलतीच्या दराने मद्य मिळवून देण्यासर त्यासोबतच जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याची मागणीहीदेखील केली आहे.

चिमूर विधानसभा मतदारसंघात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता जितेंद्र राऊत या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांना आवाहन करण्याबाबत त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील दारूबंदीच्या विषयाला त्यांनी हात घातला आहे.

जाहीरनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला पाहिजे. दारूबंदी केल्याने समाजात सुधारणा होईल, असे ज्यांना वाटत होते त्यांनी गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघावा. समाजाचा अभ्यास करताना दारू पिणे हा सामाजिक प्रथा असल्याचे जाणवते. जोपर्यंत दारूबंदीला समाजमान्यता मिळत नाही तोपर्यंत दारूबंदी प्रत्यक्षात आणणे अशक्‍य आहे. लोकांना लपून-चोरून दारू पिण्यास व विकण्यास भाग पाडण्याशिवाय दारूबंदीने काहीही साध्य झाले नाही. माझ्या क्षेत्रातील जनता चोरून लपून व दुप्पट तिप्पट भावाने दारू पिताना बघून मला दुःख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या क्षेत्रातील तरुण मुले कंपन्यांत कामासाठी गेली आहे. कुठेही काहीही अडचण जाणवत नाही. शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत सर्वजण आनंदात आहे. अशा या आनंदी समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे अगदी चूक आहे. मी आमदार झाल्यास दारूबंदी हटविण्यासाठी प्रयत्न करेन. गावागावांतील बेरोजगार तरुणांना दारूविक्रीचे परवाने मिळवून देणार. गाव तिथे बिअरबार ही योजना राबविणार, दारिद्र रेषेखालील जनतेला विस्की, बिअर सवलतीच्या दरात मिळेल, यासाठी प्रयत्न करेल, असेही त्यांनी आश्वासनात म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख