ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना नागपुरात : हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात

....
winter session to be start fronm 16 December
winter session to be start fronm 16 December

नागपूर : तब्बल एक महिन्याच्या अस्थिरतेनंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा निकाली निघाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 डिसेंबरपासून अधिवेशनाचे सत्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. ते अधिवेशन 24 तारखेपर्यंत चालणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे अधिवेशन फक्त सात दिवसांचेच असणार असल्याचे संकेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात सामना करावा लागेल. या दोघांतील सामना किती रंगतदार ठरेल, याकडे आता लक्ष लागेल. 

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्यानुसार नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नऊ डिसेंबरपासून होणार होते. मात्र, निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेवरून महिनाभर गुऱ्हाळ चालले. राष्ट्रपती राजवटही लावण्यात आली. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची गती मंदावली होती. परंतु, अखेर सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्तास्थापन झाली. काल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतली. यामुळे नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी आज यासंदर्भात बैठक घेत, तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोषित तारखेनुसार नऊ डिसेंबरला होणारे अधिवेशन त्याच दिवसापासून सुरू होण्याची शक्‍यता नाही. जाणकारांच्या मते मंत्रिमंडळाच्या गठनानंतर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन मुंबईला होईल. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत किंवा त्याच अधिवेशनात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्‍चित केली जाण्याची शक्‍यता आहे. विधिमंडळ सचिवालयाला अधिवेशनाच्या तयारीला किमान 15 ते 20 दिवस तरी लागतात. यामुळे नियोजित तारखेपासून अधिवेशन घेणे शक्‍य नाही.

त्यामुळेच ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. 22 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू केल्यास नवे वर्ष नागपुरात साजरे करावे लागेल. सरकारला नवे वर्ष मुंबईतच साजरे करायचे आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आहे. त्यामुळे 16 ते 24 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होण्याचा अंदाज आहे.

आढाव्यासाठी अधिकारी पुढील आठवड्यात नागपुरला
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आठवड्यात नागपुरला येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने नागपुरातील तयारीला जोर चढला आहे. विधानभवनातील इतर तयारी सुरू आहे. मंडप टाकण्यासाठी बांबू महिनाभरापासून येऊन आहेत. येथे नवीन इमारतही तयार करण्यात येत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शक्‍य तेवढे जास्त काम पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com