एकनाथ शिंदेंना शह : आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई कल्याण पश्चिममधून लढणार?

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्य प्रथमच मतपेटीतून 'जनआशीर्वाद' घेत विधानसभेत जाण्याची तयारी करत असतानाच त्यांच्या साथीला युवा सेनेत सक्रिय असलेले त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा शिवसेनेचा विचार सुरू आहे.
Eknath Shinde - Varun Sardesai
Eknath Shinde - Varun Sardesai

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्य प्रथमच मतपेटीतून 'जनआशीर्वाद' घेत विधानसभेत जाण्याची तयारी करत असतानाच त्यांच्या साथीला युवा सेनेत सक्रिय असलेले त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा शिवसेनेचा विचार सुरू आहे. त्यासाठी युतीच्या जागावाटपात आग्रहाने भाजपकडून मिळवलेल्या कल्याण पश्‍चिम मतदारसंघातून वरुण लढू शकतात का, याची चाचपणी केली जात आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होईल. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात एक मतदारसंघ अधिक द्या, अशी शिवसेनेची आग्रही भूमिका मान्य करत भाजपने कल्याण पश्‍चिममध्ये विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना संधी नाकारली. बेलापुरात मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीवर चर्चाही नको, असे सांगत भाजपने विरोध नोंदवला; पण कल्याण पश्‍चिम मात्र दिले.गेल्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या विजय उर्फ बंड्या साळवी यांचा भाजपच्या नरेंद्र पवारांनी जेमतेम दोन हजार मतांनी पराभव केला होता.

आता हा मतदारसंघ परत मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील चिरेबंदी बांधणीमुळे शिवसेनेचा आणखी एक आमदार होईल, हे निश्‍चित मानले जात होते; मात्र प्रत्यक्षात हा मतदारसंघ युवासेनेसाठी त्यातही आदित्य यांचे जवळचे सहकारी व मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना जिंकण्या योग्य आहे का, याची चाचपणी केली जात आहे.

आदित्य यांच्या चमूतील मंडळी सध्या 'मातोश्री'वर निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. ठाकरे कुटुंबाने ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणे म्हणजे या जिल्ह्यावर अंमल गाजवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शह देणे ठरेल, अशी चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका हाती ठेवणारे शिंदे हे शिवसेनेतले एकमेव नेते आहेत. सरनाईक हे थेट 'मातोश्री'वरून येणारे उमेदवार असल्याने सध्या शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मौन बाळगले आहे. सूरज चव्हाण, अमेय घोले हे आदित्य यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत.

सहाव्या मजल्यावर "आदित्य यान' उतरणार असल्याने त्यांच्यासमवेत त्यांचा चमू असावा, असा विचार केला जात आहे. शिवसेनेतील सूत्रांनी याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. भाजपने हा मतदारसंघ ठाकरे कुटुंबासाठी सोडला का, असा प्रश्‍न मात्र केला जात आहे.

शिवसेनेतील सर्व घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या रश्‍मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवली असल्याने कल्याणशी त्यांचे भावनिक नाते आहे. दरम्यान, वरुण सरदेसाई यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com