Will Vinayak Mete care for CM's friendship or leave alliance ? | Sarkarnama

विनायक मेटे मुख्यमंत्र्यांची मैत्री जपणार की महायुतीतून बाहेर पडणार ? 

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

महायुतीतील सर्वच घटकपक्षांना मानाचे पान मिळाले. केवळ अपवाद ठरले विनायक मेटे आणि त्यांचा पक्ष शिवसंग्राम. भाजपकडून बीड जिल्ह्यात नेते विनायक  मेटे आणि त्यांच्या पक्षाला दुय्यम वागणूक देऊन अपमानित केले जात असल्याची भावना त्यांच्या  समर्थकांत झाली आहे. त्यामुळे शिवसंग्राम महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

बीड : महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांना मंत्रीपद, महामंडळ असे मानाचे पान मिळाले. अपवाद ठरले ते केवळ आमदार विनायक मेटे आणि त्यांचा शिवसंग्राम पक्ष ! त्यामुळे कायम दुय्यम आणि अपमानित  वागणूक मिळत असल्याच्या भावनेने समर्थक अस्वस्थ आहेत. 

रविवारी बीडमध्ये शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन पुढील भूमिका घेतली जाणार आहे. तसे, सुचक वक्तव्य खुद्द विनायक मेटेंनी केले आहे. 

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी आमदार विनायक मेटे यांनी महायुतीत प्रवेश केला. महायुतीनेही बीडमधून त्यांना भाजपची उमेदवारी दिली. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांनी आपली ताकद राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकल्याने देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असलेल्या विनायक मेटेंना निसटता पराभव पत्करावा लागला. 

पुढे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात कायम दुफळी राहील याची पुरती काळजी दोन्ही बाजूंच्या निवडक लोकांनी घेतली आणि त्यात यशही आले. त्यामुळे या दोघांत कायम खटके उडत राहीले.

 जिल्हा परिषदेला विनायक मेटे यांच्या पक्षाला यश मिळाले आणि त्यांच्या पाठबळाने जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येण्यास मदत झाली. त्यावेळी मुंडे - मेटेंत दरी असली तरी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने मेटेंनी भाजपच्या पारड्यात आपले बळ टाकले. 

मात्र, या निमित्ताने जवळ आलेल्या मुंडे - मेटेंच्या गोड दुधात पुन्हा मिठाचा खडा पडला. दरम्यान, भाजपने दोन वेळा मंत्रीमंडळ विस्तार केला पण त्यात मेटेंचे नाव काही आले नाही. नेहमीची येतो पावसाळा म्हणल्याप्रमाणे ‘आता लवकरच विस्तार’ अशा घोषणा कधी देवेंद्र फडणवीस करतात तर कधी वजनदार मंत्री चंद्रकांत पाटील. पण, विस्तार काही होत नाही. 

फक्त मेटेंना टाळण्यासाठी  स्थानिक भाजप नेतृत्व ताकद पणाला लावत असल्याची विनायक मेटे आणि त्यांच्या समर्थकांची भावना झाली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांशी असलेली मैत्री आणि स्थानिक भाजपकडून अपमानास्पद वागणूक यामुळे विनायक मेटे आणि शिवसंग्रामची स्थिती ‘इकडे आड अन॒ तिकडे विहिर’ अशी झाली आहे.

 दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैत्री जपत विनायक मेटे यांना कायम बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद असो वा त्यांनी केलेल्या मागण्यांचा झटपट निपटारा असो अशा विविध माध्यमांतून त्यांच्या झोळीत कायम झुकते माप टाकले आहे.

 शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात करण्याच्या कार्यक्रमावेळी झालेल्या अपघातानंतर टिकेचे धनी ठरलेल्या मेटेंची बाजू बाजू खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाऊन धरत आपण मेटेंच्या पाठीशी असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मला मंत्रीपद नाही मिळाले तरी चालेल पण समाजाला आरक्षण आणि इतर मागण्या पूर्ण केल्याने आपण खुश असल्याचे विनायक मेटे अधून - मधून सांगत असतात. 

मात्र, यामुळे मेटे खुश असले तरी मंत्रीपदापासून केवळ त्यांनाच दुर ठेवणे आणि स्थानिक निधीतून त्यांच्याच मागण्यांना कात्री लावल्याने कायम होत असलेला अपमान समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी बळ देऊनही त्यांच्या पक्षाला येथेही अपमानच सहन करावा लागत आहे. त्यामुळे मेटे आणि समर्थक अस्वस्थ आहेत. दरम्यान, रविवारी बीडमध्ये शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारीणीची बैठक होणार आहे. 

बैठकीत सरकारने केलेली कामे आणि पक्षाला दिलेले माप याचे सिंहावलोकन होणार आहे. सत्तेत राहयचे की नाही याचा फैसलाही त्यादिवशी होण्याची शक्यता असल्याचे सुचक वक्तव्य विनायक मेटे यांनी केले आहे. त्यामुळे आता मेटे मैत्री जपणार की  अपमानाचा  बदला घेणार हे रविवारी कळणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख