will the villages included in PCMC get development ? | Sarkarnama

पिंपरी  महानगरपालिकेत  समाविष्ट गावांना आता येणार अच्छे दिन !

उत्तम कुटे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटीकडे घौडदौड सुरु केलेल्या या शहराच्या समाविष्ट  गावांत पुरेशी स्वच्छतागृहेही नाहीत. त्यामुळेच शहराचा जवळजवळ निम्मा भाग हा ग्रामीण आहे.त्यातूनच अख्या शहराला ग्रामीण बाज आहे. परिणामी येथील राजकारणही अद्याप गावकी, भावकीचेच आहे.

पिंपरीः महानगरपालिकेत समावेश होऊन विकास झाला नसल्याची राज्यातील अनेक महापालिकांतील गावांची आहे. पिंपरी-चिंचवडसह पुणेही त्याला अपवाद नाही. त्यातही उद्योगनगरीत हा प्रश्न गंभीर व ज्वलंत आहे.

पालिकेत येऊन 21 वर्षे झाल्यानंतर अनेक गावे मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तेथे पुरेसे नळाचे पाणी नाही. परिणामी विहीरीतील पाणी तेथील रहिवाशांना प्यावे लागते आहे. रस्ते नाहीत. दवाखाने नाहीत. 

स्मार्ट सिटीकडे घौडदौड सुरु केलेल्या या शहराच्या समाविष्ट  गावांत पुरेशी स्वच्छतागृहेही नाहीत. त्यामुळेच शहराचा जवळजवळ निम्मा भाग हा ग्रामीण आहे.त्यातूनच अख्या शहराला ग्रामीण बाज आहे. परिणामी येथील राजकारणही अद्याप गावकी, भावकीचेच आहे.
 
भाजप सत्तेत आल्यानंतर शहराचा ग्रामीण तोंडावळा बदलण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यातही शहराच्या उत्तर भागात भोसरी या मोठ्या उपनगराजवळील गावांत ते सुरु झालेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने आपले पहिले महापौर नितीन काळजे हे समाविष्ट गावातील (चऱ्होली) केले.

तोपर्यंत महापौरांच्या प्रभागात  (गावात) मोटार सहजपणे जाईल असा चांगला रस्ता नव्हता. त्यातूनच त्यांनी नेट लावून आपल्या गावासह लगतच्या गावातील विकासकामे (मुख्यत रस्ते)करण्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मिळविला. ही काही कामेही सुरु झाली आहेत. दरम्यान, त्यांनी राजीनामा दिला.  

प्रत्येकाला कुठले ना कुठले पद देण्याच्या धोरणातून अडीच वर्षासाठी ओबीसीकरिता राखीव असलेल्या महापौरपदावरून भाजपने काळजेंची नुकतीच उचलबांगडी केली. त्यांच्याजागी चिखलीतील राहूल जाधव या भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे किमान शहराच्या एका भागात (उत्तर) सुरु झालेला विकासाचा गाडा चालू राहील, अशी आशा तेथील समाविष्ट गावातील गावकऱ्यांना वाटते आहे. 

राजकारणाच्या कुरघोडीतून महापौरपदाचा हा निर्णय झाला असला, तरी तो समाविष्ट गावांच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यातून आमचा विकास झाला नाही, ही त्यांची तक्रार आता थांबणार आहे. त्यात अशी तक्रार करण्याची अपेक्षा असलेला विरोधी पक्षनेताही आता समाविष्ट गावातीलच आहे. सत्ताधारी भाजपप्रमाणे प्रमुख विरोधी पक्ष व मावळता सत्ताधारी राष्ट्रवादीनेही भाकरी नुकतीच फिरविली आहे. 

त्यांनीही शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागाच्या  नगरसेवकाकडे (योगेश बहल) असलेले विरोधी पक्षनेतेपद काढून घेऊन ते समाविष्ट गावाला (चिखलीचे दत्ता साने)यांना दिले आहे. त्याजोडीने सभागृहनेते (एकनाथ पवार) आणि पालिकेच्या दोन विषय समित्यांचे (महिला व बालकल्याणच्या  म्हेत्रे आणि क्रीडाचे संजय नेवाळे) सभापतीही एकाच समाविष्ट गावातील (चिखली) झाले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीतील गावांचा व  त्यातही शहराची भंगाराची बाजारपेठ अशी कुप्रसिद्धी असलेल्या चिखली व परिसराचा विकास पुढे चालू राहील, अशी अपेक्षा आहे.

 ती फोल न ठरो, अशी समाविष्ट गावकऱ्यांची इच्छा व अपेक्षा आहे. फक्तत्याकरिता सत्ताधारी आणि विरोधकांचे विकासासाठी एकमत होण्याची गरज आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख