मेट्रो वूमन अश्‍विनी भिडेंची बदली होणार का ?

मंत्रालय मुंबई, पुणे, ठाणे येथे कार्यरत असलेल्या आय.ए.एस. आणि आय.पी.एस अधिकारी सध्या रडारवर असल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील असे मानले जात आहे.
ashwini-bhide-aditya-thakare
ashwini-bhide-aditya-thakare

पुणे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मुंबई मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पुढचे पाऊल म्हणून श्री. ठाकरे मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या एम. डी . असलेल्या अश्‍विनी भिडे यांची बदल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मंत्रालय मुंबई, पुणे, ठाणे येथे कार्यरत असलेल्या आय.ए.एस. आणि आय.पी.एस अधिकारी सध्या रडारवर असल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील असे मानले जात आहे.

यामध्ये सौ. अश्‍विनी भिडे हे महत्त्वाचे नाव आहे. आरेत मेट्रोची कारशेड उभारताना सुमारे 2700 झाडांची कत्तल करण्यात आल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही वृक्षतोड करण्यात आली होती. पर्यावरणवाद्याप्रमाणेच शिवसेनेनेही ही वृक्षतोड करू नये अशी आग्रही भूमिका घेतली होती. आदित्य ठाकरे यांनी कारशेड प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती.

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अश्‍विनी भिडे यांनी प्रकल्प अन्यत्र हलवता येणे शक्‍य नसल्याचे सांगितले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल होण्याच्या बेतात असताना अश्‍विनी भिडे यांनी अतिशय वेगवान हालचाली करून आरे शेडसाठी आवश्‍यक ती अडीच हजार झाडे दोन दिवसात कापूनही घेतली होती.

या घटनेनंतर मुंबईत लोकक्षोभ उसळला होता. आदित्य ठाकरे यांनी तर 2015 पासून मुंबई मेट्रोच्या एम.डी. म्हणून काम पाहणाऱ्या अश्‍विनी भिडे यांच्या बदलीची मागणी 11 सप्टेंबर रोजी केली होती.


मुंबई मेट्रो हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट होता. तो प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा म्हणून सौ. भिडे कार्यरत होत्या. त्यांच्या काळात मेट्रो -3 टप्प्यात भारतातील जमिनी खालील सर्वांत मोठ्या 33.5 किलोमीटर बोगद्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे.

त्यापूर्वी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एम.एम.आर.डी.ए.) च्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी मुंबईतील पहिल्या मोनोरेलचे काम पूर्णत्वास नेले होते.

अश्‍विनी भिडे या मूळच्या सांगलीच्या आहेत. त्यांनी विलिंग्डन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले तर पुणे विद्यापीठातून एम.ए. इंग्लिश केलेले आहे. 1995 मध्ये युपीएसी परीक्षेत मुलींत देशात त्या प्रथम आल्या होत्या.

इचलकरंजी येथे असिस्टंट कलेक्‍टर म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग होती. सुमारे 25 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. राज्यपाल कार्यालयात उप-सचिव म्हणून काम करताना त्यांनी विदर्भ मराठवाड्याच्या अनुशेष विभागाचे काम पाहिलेले होते.

मंत्रालयातही उप-सचिव आणि सचिवपदावर त्यांनी काम केलेले असून शिक्षण सचिव म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांचे पती सतीश भिडे हे देखील आय.ए.एस अधिकारी होते. त्यांनी 2012 मध्ये प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिलेला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com