डोंबिवलीचे जावई राखणार का कल्याण-डोंबिवलीचा गड?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते.आता 2020 च्या निवडणुकीत दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे चित्र अधिक प्रकर्षणाने पाहावयास मिळणार आहे
Will Uddhav Thackeray Retain Kalnay Dombivli Corporation
Will Uddhav Thackeray Retain Kalnay Dombivli Corporation

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाने या निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला होता. आता 2020 च्या निवडणुकीत दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे चित्र अधिक प्रकर्षणाने पाहावयास मिळणार आहे.

राज्यात विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला वेळोवेळी धारेवर धरणारे देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकrतही आक्रमक होतील यात शंका नाही. त्यात डोंबिवलीचे जावई असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या आक्रमकतेचा कसा 'सामना' करतात आणि कल्याणची सुभेदारी कशी राखतात ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

2015 च्या निवडणुकीत 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र नगरपालिकेचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षात याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. तर गावे पालिकेतच राहावी असा सेनेचा आग्रह होता. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले.

मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे केडीएमसीमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपवर कुरघोडी करण्यासाठी सेनेच्या जिल्हानेतृत्वानेही स्वतंत्र नगरपालिकेबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आगामी काळात निवडणुकीच्या तोंडावर 'हीच ती वेळ " असे म्हणत याबाबत ठोस भूमिका घेतली जाण्याची दाट शक्‍यता असून 'करून दाखविले " असा प्रचार करण्याचे सेनेचे मनसुबे असल्याचे बोलले जाते.

कल्याणात सेनेचा बोलबाला असला तरी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या डोंबिवलीत सेनेसमोर प्रामुख्याने भाजप आणि त्यानंतर मनसेचे देखील कडवे आव्हान आहे. सुशिक्षित ,सांस्कृतिक आणि मध्यमवर्गीयांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहराचे अनेक राजकीय नेत्यांना आकर्षण वाटते. नुकतेच डोंबिवलीत प्रदूषणामुळे गुलाबी रंग प्राप्त झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी ठाकरे हे लागलीच शहरात दाखल झाले होते.

त्यामुळे या पालिका निवडणुकीत ठाकरे हे जातीने लक्ष घालतील अशी चर्चा आहे.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे पाठबळ सेनेला मिळण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्याचे सेनेचे स्वप्न भंगले होते.त्यामुळे यंदा भाजपाला शह देत व राजकीय गणितं जुळवण्याचे 'शिवधनुष्य " उद्धव ठाकरे कशाप्रकारे पेलतात? ते पाहावे लागेल.

यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सार्वधिक जागा निवडून येणार असून महापौर पदाचा मान देखील भाजपाला मिळणार आहे. सेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याने मतदार त्यांच्यावर नाराज आहेत - नरेंद्र पवार, माजी आमदार , भाजप

मागील वर्षी साडेसहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यामुळे जनतेची दिशाभूल झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसेच स्वतंत्र नगरपालिकेबाबत उद्धव ठाकरे हेदेखील सकारात्मक आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या हातमिळवणी बाबत वरिष्ठ ठरवतील. मात्र भाजपाच्या तुलनेत सेनेचेच पारडे जड राहील यात शंका नाही - विश्वनाथ भोईर , आमदार , शिवसेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com