तानाजी सावंतांच्या भावाचे स्वप्न भंगणार?

प्रसंगी उद्धव ठाकरे यवतमाळमधून नाही लढले तरी ती जागा शिवाजी सावंत यांनाच मिळेल, याची खात्री नाही. कारण स्थानिक उमेदवार देण्याची मागणीही पुढे येवू शकते. तानाजी सावंत मंत्रीमंडळात असताना पुन्हा त्यांच्या भावाला आमदारकी कशाला, असा मुद्दाही उपस्थित होवू शकतो.
will tanaji sawant's brother dream fade away
will tanaji sawant's brother dream fade away

पुणे: फडणवीस सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील संभाव्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू पहात असलेले आमदारकीचे स्पप्न भंगण्याची शक्यता आहे. त्यांची विधान परिषदेवर जाण्याची संधी धुसर झाली आहे. 

मूळ सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील असलेल्या तानाजी सावंत यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच साखर कारखानदारीतही भरीव योगदान दिले आहे. चार वर्षापुर्वी ते शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. तत्पुर्वी त्यांचे बंधू शिवाजी सावंत राजकारणात सक्रिय होते. कधी स्थानिक आघाडी तर कधी शिवसेनेच्या माध्यमातून ते माढा विधानसभेची निवडणूक लढले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. 

तीन वर्षापुर्वी तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन करत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळवली. निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यानंतर ठाकरे यांनी सावंतांवर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याची पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवली, तसेच त्यांना कॅबिनेट मंत्रीही केली. परिणामी सावंत यांचे या दोन्ही जिल्ह्यात वेगाने महत्व वाढले. पुढील काळात त्यांनी सोलापूर जिल्हा शिवसेनेची जबाबदारी बंधू शिवाजी सावंत यांच्याकडे सोपवली. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून लढले. शिवाजी सावंत हेही माढा मतदारसंघात उभे राहण्याची शक्यता होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला.  परांड्यातून अपेक्षेप्रमाणे तानाजी सावंत मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर त्यांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. सावंत यांच्या आमदारकीची मुदत 15 डिसेंबर 2022 पर्यंत असल्याने यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाची पोटनिवडणूक काही दिवसांत लागणार आहे. या रिक्त जागेवर शिवाजी सावंत यांना खात्रीने संधी मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. मात्र त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थती तयार होताना दिसत नाही. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तानाजी सावंत यांना आणखी वजनदार खाते मिळेल अशी चांगली बातमी असताना शिवाजी सावंत यांच्या सोयीचे घडताना काही दिसत नाही. कारण उद्धव ठाकरे यांना सहा महिन्याच्या आत विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार असल्याने यवतमाळची जागा शिवाजी सावंत यांना मिळेल की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. 

विधानसभा की विधान परिषद, हा निर्णय उद्धव यांना लवकर घ्यावा लागणार आहे. विधानसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यास एखांद्या सेना आमदाराला आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर पुढे आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. या पद्धतीने लढायचे झाल्यास उद्धव यांच्यापुढे माहिम आणि उस्मानाबाद मतदारसंघाचे पर्याय आहेत. या दोन्ही ठिकाणी सेनेचे आमदार आहेत. या दोन्ही पैकी एका ठिकाणी उभे राहिलेतरी त्यांच्याविरोधात भाजपकडून उमेदवार दिला जाणार आहे. विजयापेक्षा अनैतिक आघाडीचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करून लढत रंगतदार करण्याचा प्रयत्न होवू शकतो. शिवाय जनमानसाचा अंदाज या पोटनिवडणुकीत येवू शकतो. त्यावरून महाआघाडीला लोकांनी किती स्विकारले आहे, याचे विश्लेषणही होवू शकते. त्यामुळे विधानसभेपेक्षा विधान परिषदेचा पर्याय उद्धव स्विकारू शकतात. 

विधान परिषदेवर जायचे असेल तर यवतमाळची हक्काची जागा त्यांच्याकडे आहे. तानाजी सावंतांच्या रिक्त जागेवर ते आरामात निवडून जावू शकतात. अगदी ते बिनविरोधही होवू शकतात, ते तानाजी सावंत यांच्यासाठी शक्य आहे. शिवाय यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. उद्धव यांच्यादृष्टीने शेतकरी हा काळजातील विषय आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याला उद्धव प्राधान्य देतील, असे मानले जात आहे. परिणामी शिवाजी सावंत यांच्या आमदारकीच्या स्वप्नावर सद्यातरी पडदा पडेल, अशी परिस्थिती दिसत आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com