`फडणवीस सरकारची भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे बाहेर काढणार`

...
prithvirah-chavan challenges fadnavis
prithvirah-chavan challenges fadnavis

नाशिक ः राज्यातील सत्तांतरानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काय करावे लागत होते, अशी गाऱ्हाणे अधिकारी सांगू लागले आहेत. त्यामुळे राजरोसपणे केलेल्या भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे बाहेर काढण्यात येतील. त्यामध्ये समृद्धी महामार्गाचा सुद्धा समावेश असेल, असे महाविकास आघाडीचे सरकार व्हावे म्हणून आघाडीवर राहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.

भाजप आणि त्यांचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून त्यांची विधाने पुढे येताहेत. मुळातच, सरकारला स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र पहिल्याच दिवसांपासून त्यांची कशी अवस्था झाली याचे दर्शन राज्यातील जनतेला घडत आहे, असे टीकास्त्र श्री. चव्हाण यांनी सोडले.

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या गांधी शांती यात्रेतून ते नाशिकमध्ये आले होते. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सरकारमध्ये 22 ते 25 मंत्रीपद असायचे. आता ही संख्या निम्म्यावर आली. त्यामुळे नाराजी असणे स्वाभाविक आहे. त्यातूनही काही चुकून गोष्ट झाली असल्यास त्यात दुरुस्ती होईल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

भाजपने कोणाशीही करावी आघाडी
महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय घडले हे राज्याने पाहिले आहे. त्यामुळे भाजपने कोणाशी मैत्री करावी हा पक्षातंर्गतचा विषय आहे, असे श्री. चव्हाण यांनी भाजपच्या मनसेसोबतच्या आघाडीच्या अनुषंगाने पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर दिले. पुन्हा हाच प्रश्‍न पुढे आल्यावर श्री. चव्हाण यांनी मनसे काय पण एम. आय. एम. अशा कोणाशीही आघाडी करावी, असे उत्तर दिले.

फडणवीसांना रोखण्यासाठी आघाडी
राज्याचा मी मुख्यमंत्री असताना 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नव्हता. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून वावरणारे देवेंद्र फडणवीस यांना विरोधक चालत नाही म्हटल्यावर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली, असे स्पष्टीकरण श्री. चव्हाण यांनी दिले. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंबंधी चांगले काम केलेल्या सारथी संस्थेला काम करु द्यायला हवे, असाही निर्वाळा त्यांनी दिला.

"न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबद्दल मोठी शंका आहे. न्यायालयीन, घटनात्मक पद्धतीने चौकशी करुन या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबद्दल निर्णय घ्यावा,'' असे त्यांनी मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com